एलबीटीविरोधात मनसेने घातला धुडगूस

By Admin | Updated: June 11, 2014 01:03 IST2014-06-11T01:02:42+5:302014-06-11T01:03:59+5:30

गटबाजी चव्हाट्यावर : कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, पोलिसांकडून चौघांना अटक

MNS rebuffed against LBT | एलबीटीविरोधात मनसेने घातला धुडगूस

एलबीटीविरोधात मनसेने घातला धुडगूस

सांगली : एलबीटीविरोधी आंदोलनावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली. मनसेच्या व्यापारी सेनेने एलबीटी कार्यालयात धुडगूस घालत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी व्यापारी सेनेचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांच्यासह चारजणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी सेनेच्या आंदोलनानंतर थोड्याच वेळात माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या गटाने कार्यालयासमोर निदर्शने केली.
एलबीटीविरोधात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्यावतीने निदर्शने केली जाणार होती. त्याची कुणकुण लागताच व्यापारी सेनाही जागी झाली. शिंदे यांच्या आंदोलनापूर्वीच व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शहा हे सात ते आठ कार्यकर्त्यांसह स्टेशन चौकातील एलबीटी मुख्यालयात आले. आंदोलनामुळे कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. शहा व अन्य कार्यकर्त्यांनी हातोडा, गजाच्या सहाय्याने लोखंडी जाळीचे प्रवेशद्वार तोडले. त्यानंतर कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्या फेकून दिल्या. अचानक झालेल्या या हल्ल्याने एलबीटी कार्यालयातील कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले. काही कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्कीचे वृत्त समजताच शहर पोलीस घटनास्थळी धावले. पोलिसांना पाहून काही आंदोलकांनी पलायन केले, तर जितेंद्र शहा, विनोद शेलार, सदाशिव कबाडे, केतन कांबळे यांना अटक करण्यात आली. एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दरम्यान, व्यापारी सेनेचे आंदोलन संपल्यानंतर माजी आमदार नितीन शिंदे, अ‍ॅड. स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एलबीटी हटावसाठी मोर्चा काढून निदर्शने केली. शासनस्तरावर निर्णय होईपर्यंत महापालिकेने जप्तीची कारवाई करू नये, कर तातडीने रद्द करावा, महापालिका कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात आदित्य पटवर्धन, सुनीता इमानमदार, प्रियानंद कांबळे, बाजीराव गस्ते, लीना सावर्डेकर, वनीता मौर्य, विजय मौर्य, चेतन भोसले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: MNS rebuffed against LBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.