जाती अंतासाठी समतावादी विचारांचे मिश्रणच प्रभावी- थेट संवाद
By Admin | Updated: August 5, 2014 00:13 IST2014-08-04T23:58:12+5:302014-08-05T00:13:54+5:30
जी. के. ऐनापुरे यांचे मत

जाती अंतासाठी समतावादी विचारांचे मिश्रणच प्रभावी- थेट संवाद
--पुरोगामी महाराष्ट्रात जातीवाद फोफावण्याची नेमकी कारणे कोणती?
- धर्मकारण हेच जातीवादाचे मूळ कारण आहे. देशात धर्मशास्त्र आणि ते ऐकणारे आणि त्याप्रमाणे कृती करणारे यांच्यातील नातेसंबंध इतका घट्ट आहे की, पुरोगामी या शब्दाची व्याप्ती महाराष्ट्रातून हद्दपार होईल की काय? अशी भीती वाटते. पुरोगामीत्वाची स्पेस निर्माण करण्यासाठी या दोघांमध्ये मानवतावादी विचारसरणीचा आधार घेत आपण भिंतीसारखे उभे राहिले पाहिजे. हा समतेचा मार्ग मार्क्स, फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर असा जातो. नेमका हाच मार्ग धर्ममार्तंडांनी उचलून विष पेरण्याचे काम केले आहे.
४जाती अंताची लढाई करणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचा पराभव झाला आहे, असे तुम्हाला वाटते का?
- जाती अंताची लढाई लढणाऱ्या महापुरुषांचा पराभव करण्याचे राजकीय धोरण आपण सर्वांनीच पूर्वीपासून स्वीकारलेले आहे. याला जे अपवाद आहेत, त्यांनी या महापुरुषांना त्यांच्या विचारासह जतन करण्याचे काम इतिहास, इतर काही शास्त्रामधून लावून धरले आहे. इतिहासाकडे मागे वळून पाहणे, हा आपण वैचारिक मध्यमवर्गीय झाल्याचा फार मोठा पुरावा आहे. अशा मध्यमवर्गीयांना चळवळीत स्थान नसते. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास इतिहासातील आपले स्थान धर्मशास्त्राच्या ओझ्याखाली आपसूकच जाईल, ही भीती मनाशी ठेवूनच आपण क्रियात्मक आणि प्रतिक्रियात्मक झाले पाहिजे. तरच आपल्या महापुरुषांना सन्मान मिळेल.
--भूतकाळातील जातीवाद आणि वर्तमानातील जातीवाद यातील तुमच्यादृष्टीने तुलनात्मक फरक काय?
- पूर्वीचा जातीवाद आणि आताचा जातीवाद यामधील मूलभूत फरक म्हणजे ‘शिक्षित अडाणीपणा’ होय. पूर्वीच्या जातीवादातील जी एक आत्मियता होती आणि विखारीपणाही होता, तो आता मनुवादी अवस्थेत बदललेला आहे. आरक्षणाची वर्गवारी पाहता, जात ही गोष्ट ‘स्वाभिमान’ अशा अर्थाने विस्तारताना दिसते आहे. हा आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा मोठा पराभव आहे. याचा सर्वात मोठा फटका शिक्षणामध्ये एकवटलेल्या बहुजन समाजाला भविष्यात बसेल. धर्ममार्तंडांना वर्चस्ववादासाठी हीच गोष्ट टोकदारपणे करावयाची आहे आणि जोपासायची आहे.
--जाती निर्मूलनासाठी नेमके काय करण्याची गरज आहे? कुणी करण्याची गरज आहे?
- डॉ. आंबेडकरांच्या ‘जात निर्मूलन’ या पुस्तकामधील विवेचन पाहता, बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला असला तरी, हिंदू धर्माकडे ते सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. जाती निर्मूलनाची सर्वात जास्त गरज या धर्माशीच निगडीत आहे, हे आपल्या ध्यानात येते. जातीचा मूळ स्रोत हा धर्माकडेच जातो. म्हणून प्रथम धर्मसुधारणा, मग हळूहळू धर्मनिरपेक्षता, आरक्षण, आर्थिक सुबत्ता, बेरोजगारी, शिक्षण, महिलांचे आरोग्य, कर्मठ विधी आदी गोष्टींकडे गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे. मनुष्याला स्वत: जात हा घटक विखारी आणि विकृत, उपयोगी नसलेला आहे आणि त्याचा धर्मशास्त्राशी कोणताही संबंध नाही, हे पटवून दिल्याशिवाय जाती निर्मूलनाच्या पुढच्या टप्प्याकडे जाणे अशक्यच आहे. आंबेडकरी विचारधारा मानणारे, डावी विचारधारा अस्तित्वात ठेवणारे यांच्यातील घट्ट संबंधावरच सांस्कृतिक बळ निर्माण होईल.
--आंबेडकर आणि मार्क्सवाद यांचा जात या विषयाशी संबंध जोडताना तुम्ही काय म्हणाल?
- वर्ग आणि वर्ण या दोन्ही गोष्टी मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यांच्यात दरी निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. एकमेकांना दोष देण्यापेक्षा मार्क्सवाद्यांनी आणि आंबेडकरवाद्यांनी एकत्रित काम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील काही पुरोगामी साहित्यिक व विचारवंतांनी आंबेडकरवाद व मार्क्सवाद या दोन्ही विचारधारा किती एकमेकांच्या जवळ येतात आणि त्या विचारधारांनी एकत्रित येण्याची उपयुक्तता किती महत्त्वाची आहे, हे सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला आहे, हे समजून घेणे ही आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाची जाणीव ठरावी,
असे वाटते.
--जाती निर्मूलन या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाबाबत तुम्ही काय म्हणाल?
- सद्यस्थितीला देशात सोशल मीडियाचा वेगाने प्रसार झालेला आहे. सोशल मीडियातून होणारा प्रचार आणि प्रसार हा सामाजिक एकात्मता जपणारा असावा, असे वाटते. युवा पिढीने सोशल मीडियासारख्या माध्यमातून जातीभेदाची बीजे न पेरता जाती निर्मूलनासाठी काम करावे आणि देशाची एकता टिकविण्याचा प्रयत्न करावा, असे मला वाटते.
— अर्जुन कर्पे (कवठेमहांकाळ)
जी. के. ऐनापुरे यांचे मत
‘‘माणसाचे रक्त भगवे, हिरवे, निळे नसून ते फक्त लाल आहे. देशात फोफावलेला जातीवाद रोखण्यासाठी आणि जातीवादाच्या चक्कीत हजारो वर्षे पिसल्या गेलेल्या माणसांना स्वाभिमानाचं आणि सन्मानाचं जीवन जगण्यासाठी, तसेच देशात फोफावलेला जातीवाद गाडण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर वाद आणि मार्क्सवाद तसेच मानवतावादी विचारसरणी सांगणाऱ्या महापुरुषांच्या समतावादी विचारांचे मिश्रणच प्रभावी ठरू शकेल...’’ सांगली येथे जाती अंत संघर्ष समितीच्यावतीने ५ आॅगस्ट रोजी जाती अंत परिषद होत आहे. या पार्श्वभूमीवर या परिषदेचे अध्यक्ष प्रा. जी. के. ऐनापुरे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला थेट संवाद.