जत तालुक्यात ‘बंद’ला समिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:26+5:302020-12-09T04:22:26+5:30

जत : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात व नवीन तिन्ही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी आणि दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाला ...

Mixed response to 'Bandh' in Jat taluka | जत तालुक्यात ‘बंद’ला समिश्र प्रतिसाद

जत तालुक्यात ‘बंद’ला समिश्र प्रतिसाद

जत : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात व नवीन तिन्ही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी आणि दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘जत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दैनंदिन व्यवहार बंद होते. सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला, तर बारा ते दोन वाजेपर्यंत पन्नास टक्के बंद व त्यानंतर संपूर्ण व्यवहार सुरळीत सुरू झाले.

बंद कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवार आठवडा बाजार असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, काँग्रेसतर्फे श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार परिसरात केंद्र शासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. केंद्र सरकारने कृषी कायदे पाठीमागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी आमदार विक्रम सावंत, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, नगरसेवक भूपेंद्र कांबळे व सुजय शिंदे, गणेश गिड्डे, ॲड. युवराज निकम, संतोष भोसले, फिरोज नदाफ, इराण्णा निडोणी आदी उपस्थित होते.

जत तालुका राष्ट्रवादीतर्फे तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देऊन बंदला पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी जत तालुका अध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष अध्यक्ष उत्तम चव्हाण, उपाध्यक्ष आप्पाराया रेऊर व मच्छिंद्र वाघमोडे, तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष पवन कोळी व हेमंत खाडे, जयंत भोसले, रूपेश पिसाळ, रमजान नदाफ, सागर चंदनशिवे, मयूर माने, अमरसिंह माने-पाटील, प्रवीण साळे, अक्षय माडे, पंकज संकपाळ, शफीक इनामदार, राजू मुल्ला व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Mixed response to 'Bandh' in Jat taluka