शिराळा तालुक्यात मिठी सत्याग्रह सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:24 IST2021-04-05T04:24:21+5:302021-04-05T04:24:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यातील स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमितील मुठभर माती उचलून ...

Mithi Satyagraha started in Shirala taluka | शिराळा तालुक्यात मिठी सत्याग्रह सुरू

शिराळा तालुक्यात मिठी सत्याग्रह सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा तालुक्यातील स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमितील मुठभर माती उचलून सत्याग्रह करण्यात आला. गांधीजींचे अनुयायी बाबुराव चरणकर यांच्या चरण येथील वाड्यातून या सत्याग्रहाची सुरुवात झाली. आरळा, बिळाशी आणि मांगरूळ येथील हुतात्मा स्मारकात हा अभिनव मिट्टी सत्याग्रह करण्यात आला.

यावेळी ‘हुतात्म्यांच्या रक्तात भिजलेली माती-विकू देणार नाही.’ अशी प्रतिज्ञा करण्यात आली. हे सर्व हुतात्म्यांच्या मातीचे कलश ६ एप्रिल रोजी सांगली येथे एकत्र करून, आमराईत हुतात्मा पत्रावळे यांच्या पुतळ्याजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तर त्या मातीतील निम्मा भाग दिल्लीच्या आंदोलनासाठी पाठवला जाणार आहे.

संयुक्त किसान मोर्चाने हा सत्याग्रह सुरू केला आहे.

संयुक्त किसान मोर्च्याच्या वतीने देशभर चालू असलेल्या आंदोलनाच्या सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमाचा समारोप ६ एप्रिल रोजी सांगलीत होत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना, पुरोगामी आणि समाजवादी पक्ष संघटना या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या सत्याग्रहाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारचे कार्यकर्ते भगवानराव मोरे बप्पा यांच्या हनुमंतवडीये या गावातून झाली. क्रांतिवीरांगणा हौसाक्का पाटील यांच्या हस्ते मुठभर माती उचलून सत्याग्रह सुरू झाला. सांगली जिल्ह्यात जेथे जेथे इंग्रजांच्या विरोधातील लढ्यात हुतात्म्ये झाले तेथील माती एकत्रित करून सत्याग्रह करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून आज शिराळा तालुक्यातील चरण, आरळा, बिळाशी आणि मांगरूळ येथे प्रतीकात्मक मिठी सत्याग्रह करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. विजयकुमार जोखे, शिराळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवी पाटील, कॉम्रेड दिग्विजय पाटील, प्रा. डॉ. मिलिंद साळवे, प्रा. आर एन. कांबळे, सुवर्णा कुलकर्णी, राजाभाऊ चरणकर, कादरभाई नायकवडी, करीम नायकवडी, मोहन शिंदे, सत्तार मुजावर, गुलाबभाई नायकवडी, करीमभाई नायकवाडी, कैलास देसाई, विश्वास शिंदे, विजय कुंभार, कृष्णा कुंभार, जयसिंग खांडेकर, नामदेव खांडेकर, वैभव खांडेकर, मारुती रोकडे, विकास मोहिते, प्रताप काळे आदी उपस्थित होते.

Web Title: Mithi Satyagraha started in Shirala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.