इस्लामपुरात नगराध्यक्षांकडून कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:44+5:302021-04-01T04:27:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : पालिकेतील विकास आघाडीच्या नेत्यांनी कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून शहरातील विकासकामांच्या आड येऊ नये. ...

Misuse of law by mayors in Islampur | इस्लामपुरात नगराध्यक्षांकडून कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर

इस्लामपुरात नगराध्यक्षांकडून कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : पालिकेतील विकास आघाडीच्या नेत्यांनी कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून शहरातील विकासकामांच्या आड येऊ नये. विकासकामे रोखण्याचा त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे मार्गी लावणारच, असा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक विश्वनाथ डांगे यांनी बुधवारी दिला, तर सभा पुुढे ढकलून विकास आघाडीने पालिकेच्या इतिहासात काळा दिवस नोंदविल्याची टीका शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

गटनेते संजय कोरे म्हणाले, पालिकेची सभा बोलविण्यासाठी अधिनियमात विविध कलमांची तरतूद आहे. मात्र, नगराध्यक्षांकडून या कलमांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. आजच्या सभेची नोटीस कायद्याला धरून नव्हती. त्यामुळे त्यावर आक्षेप घेतल्यावर सभा तहकूब करण्यात आली. हरकतीवर निर्णय देताना सभा कामकाज अधीक्षकांची चूक आहे, असे सांगत ते फेटाळली. आम्ही दिलेल्या विकासकामांमध्ये कोणताही दुजाभाव न करता सर्व प्रभागांचा समावेश केला आहे.

डांगे म्हणाले, वेळेचा अपव्यय करून सभा होणार नाही, एवढाच अजेंडा विकास आघाडी आणि शिवसेनेकडून राबविला जात आहे. आम्ही दिलेल्या विषयावर सभा होणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असताना नगराध्यक्षांनी वेगळे १५ विषय प्राधान्यक्रमाने व्हावेत, जयंत पाटील यांनी आणलेल्या निधीला विरोध करून विकासकामे होऊ नयेत, यासाठी वारंवार सभा तहकूब अथवा पुढे ढकलण्याचे षङ्यंत्र रचले आहे.

खंडेराव जाधव म्हणाले, आजच्या ऑनलाईन सभेत सर्वांना सुस्पष्ट आवाज ऐकू येत होते. मात्र, ऐकू येत नाही अशी सबब पुढे करीत विकास आघाडीचे नगरसेवक गोंधळ माजवीत होते. विक्रम पाटील तर कोणता विषय सुरू आहे असे वारंवार म्हणून खिल्ली उडवत होते. शेवटी समन्वयकाचा बळी देत ही सभा तहकूब केली.

यावेळी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, सुनीता सपकाळ, संगीता कांबळे, सदानंद पाटील उपस्थित होते.

चौकट

बालिश बोलणे थांबवावे

भुयारी गटार योजनेच्या सांडपाणी प्रकल्पाच्या जागा ताब्यात असल्याशिवाय निविदा काढू नयेत, असे शासनाचे स्पष्ट निर्देश होते. मात्र, तरीही वेगवेगळ्या निविदा काढून सत्ताधाऱ्यांनी आपापले खिसे भरून घेतले. यावर नगरविकास विभागाने ताशेरे ओढले आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी जबाबदार आहेत. विकास आघाडीच्या नगरसेवकांनी बालिश बोलणे थांबवावे, असा टोला डांगे यांनी मारला.

Web Title: Misuse of law by mayors in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.