चेंबर ऑफ कॉमर्सची हळदीविषयी माहिती दिशाभूल करणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:44+5:302021-08-14T04:31:44+5:30
सांगली : हळद शेतमाल असल्याचे सिद्ध झाल्याने मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सेवाकर माफ झाल्याची माहिती चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षांनी ...

चेंबर ऑफ कॉमर्सची हळदीविषयी माहिती दिशाभूल करणारी
सांगली : हळद शेतमाल असल्याचे सिद्ध झाल्याने मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सेवाकर माफ झाल्याची माहिती चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षांनी दिली होती. जीएसटी विभागाने सेवाकराच्या नोटिसा रद्द केल्याचेही सांगितले होते, पण ही माहिती वस्तुस्थितीदर्शक नसून दिशाभूल करणारी असल्याचा खुलासा जीएसटी विभागाने केला आहे.
प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, चेंबर ऑफ कॉमर्सच्या माहितीने व्यापाऱ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितली तशी वस्तुस्थिती नाही. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय जीएसटीने कमिशन एजंट व शीतगृह चालकांनी सेवाकर भरला नसल्याबद्दल कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी दोन प्रकरणांत मूळ न्यायनिर्णय प्राधिकाऱ्यांनी हळद, बेदाणा, गुळावर सेवाकर आकारणी योग्य असल्याचा निर्णय दिला होता. या आदेशाविरुद्ध याचिकाकर्त्या व्यापाऱ्यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे अपिल केले होते. त्यांनी गूळ व बेदाण्यावर सेवार सेवाकर आकारणी योग्य असल्याचा निवाडा केला होता. हळदीवर मात्र सेवाकर आकारणी करता येणार काही असा निर्णय घेतला होता. हळदीच्या निर्णयाविरोधात जीएसटी विभागाने मुंबई लवादाकडे दाद मागितली आहे. त्यावर निर्णय अद्याप झालेला नाही. हा विषय अद्याप अंतिम पातळीवर पोहोचला नसल्याने कारणे दाखवा नोटिसा मागे घेण्याचा विषय उपस्थित होत नाही.