मिरज तालुक्यामधील ‘रोहयो’ कामास खो!
By Admin | Updated: September 5, 2014 23:28 IST2014-09-05T22:56:47+5:302014-09-05T23:28:56+5:30
अपुरे कर्मचारी : चौघांवर कामाचा प्रचंड ताण

मिरज तालुक्यामधील ‘रोहयो’ कामास खो!
मालगाव : मिरज तालुक्यात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांवर परिणाम झाला आहे. योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता बोजा पडत असल्याने कामे रखडू लागली आहेत. रोजगार हमी योजनेच्या कामांचा निपटारा करण्यासाठी दोन जादा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीसह ४७ प्रकारच्या कामांचा समावेश आहे. मिरज तालुक्यात १२ प्रकारची कामे राबविली जात आहेत. रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांनी प्रयत्न सुरू केले असले, तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. कामे रखडण्यावरही कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येचा परिणाम होऊ लागला आहे. तालुक्यात सध्या रोजगार हमी योजनेतंर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांमध्ये विहीर खुदाई व जनावरांचा गोठा बांधकामाला जादा मागणी आहे. विहीर खुदाईच्या १०० कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ४७ कामे सुरूकेली आहेत. विहीर खुदाईपेक्षा जनावरांच्या गोठा बांधकाम कामांसाठी ७०० मागणी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पैकी ३०० कामांना मंजुरी देण्यात आली आहे. अद्यापही अर्ज दाखल होत आहेत. मागणी व मंजुरीचा आलेख पाहिल्यास त्या तुलनेत कामे सुरू झालेली नाहीत. याला प्रामुख्याने अपुरे कर्मचाऱ्यांचे ठळक कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. जनावरांच्या तीनशे प्रकरणांना मंजुरी दिली असताना १० कामे सुरू आहेत. कामांच्या वाढत्या मागणीचा चार कर्मचाऱ्यांवर बोजा पडल्याने त्याचा परिणाम कामे रखडण्यावर होत आहे.
रोजगार हमी योजनेची कामे राबविताना गावभेट, जागांची पाहणी करणे, कामांची मोजमापे देणे, मजुरांच्या कामांची नोंद करणे, कामांचे मूल्यांकन करणे, बिले काढणे, खर्चाचा हिशेब ठेवणे ही जबाबदारीची कामे पार पाडावी लागतात. यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग असणे आवश्यक आहे. मात्र तालुक्यात योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांना ही कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाढीव कामांचा निपटारा करताना विलंब लागत आहे. कामांचे नेटके नियोजन असले तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांची समस्या भेडसावू लागली आहे. तालुक्यासाठी अधिकाधिक कामे राबविण्यासाठी दोन जादा संगणकीय ज्ञान असणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज असल्याने जि. प. प्रशासनाने याची दखल घेऊन मिरज पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेच्या विभागाकडे दोन कर्मचाऱ्यांची तातडीने नमणूक करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
मिरज तालुक्याचे प्रामुख्याने पूर्व व पश्चिम असे दोन भाग येतात. या दोन भागासाठी वेगवेगळ्या तांत्रिक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेच्या पाचहून अधिक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सुरुवात करण्यासाठी या तांत्रिक अधिकाऱ्यांची गरज असते. ‘कामे अनेक, मात्र अधिकारी एक’ या परिस्थितीमुळे सर्वच कामांचे वेळेत नियोजन करणे शक्य नसल्याने कामांच्या वाढत्या बोजामुळे या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.