मिरजेत सराफाचे घर फोडले
By Admin | Updated: November 2, 2015 00:38 IST2015-11-02T00:06:24+5:302015-11-02T00:38:33+5:30
शहरात खळबळ : पाच लाखांचा ऐवज लंपास

मिरजेत सराफाचे घर फोडले
मिरज : मिरजेतील ब्राह्मणपुरीत विनोद गोपीनाथ नरगुंदे या सराफाचे घर फोडून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज चोरून नेला. शहरात भरवस्तीत झालेल्या घरफोडीने खळबळ उडाली होती. श्वानपथकाच्या साहाय्याने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
विनोद नरगुंदे यांचे शनिवारपेठेत नरगुंदे ज्वेलर्स हे सराफी दुकान व ब्राह्मणपुरीतील भोकरे गल्लीत जुन्या वाड्यात घर आहे. विनोद नरगुंदे सपत्नीक शुक्रवारी पनवेल येथे नातेवाइकांकडे गेल्यामुळे घरात वृद्ध आई-वडील होते. चोरट्यांनी नरगुंदे यांच्या जुन्या वाड्यात प्रवेश करून घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. आतील किल्ल्या घेऊन लोखंडी कपाटे उघडली. कपाटातील सुमारे २० तोळ्यांचे दागिने, रोख २५ हजार रुपये घेऊन पलायन केले. आज सकाळी घरकाम करणारी महिला आल्यानंतर खोल्यांचे दरवाजे उघडे असल्याचे व आतील साहित्य विस्कटल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. नरगुंदे यांचे वृद्ध आई-वडील शेजारच्या खोलीत होते. त्यांना कोणतीही माहिती होऊ न देता चोरट्यांनी घरफोडी करून पाच लाखांचा ऐवज चोरून नेला. चोरीबाबत माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी आला.
पोलिसांच्या श्वानपथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वानपथक घरापासून शंभर फूट अंतरावर रुंगठा उद्यानापर्यंत जाऊन घुटमळले. चोरटे तेथून वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे. (वार्ताहर)
माहीतगाराचे कृत्य?
नरगुंदे कुटुंबीय तीन दिवस परगावी गेल्याचे चोरट्यांना माहिती होते. चोरट्यांनी कुलूप उचकटून आतील किल्ल्यांच्या साहाय्याने कपाटे उघडली. नरगुंदे यांनी जुन्या पॅन्ट व शर्टच्या खिशात ठेवलेल्या किल्ल्यांचा चोरट्यांनी वापर केला. यामुळे चोरटा माहीतगार किंवा नरगुंदे यांचा परिचित असल्याचा पोलिसांचा संशय आहे. चोरट्यांनी सोने व रोख रक्कम चोरली; मात्र घरातील सुमारे तीन किलो चांदीच्या भांड्यांना हात लावलेला नाही. चोरट्यांनी स्वयंपाकघरातील धान्याच्या, पीठाच्या डब्यातही शोधाशोध केली.