मिरजेत महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST2020-12-05T05:08:34+5:302020-12-05T05:08:34+5:30
------------------------- कापूसखेडमध्ये एकरी १२७ टन उसाचे उत्पादन इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप तुकाराम पाटील यांनी ...

मिरजेत महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा जल्लोष
-------------------------
कापूसखेडमध्ये एकरी १२७ टन उसाचे उत्पादन
इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप तुकाराम पाटील यांनी २० गुंठे क्षेत्रात ६३.७३२ टन विक्रमी ऊस उत्पादन घेतले. त्यांनी सरासरी एकरी १२७.४६४ टन उत्पादन घेतले. या क्षेत्रात त्यांना एका गुंठ्यामध्ये ३ टन १८६ किलो असा उतारा पडल्याने या परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. माजी सरपंच प्रदीप पाटील यांना राजकारणाबरोबरच शेतीची आवड आहे. त्यांना रामलीला उद्योग समूहाचे शहाजी पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. पाटील यांनी ८६०३२ या जातीच्या दोन डोळा टिपरी उसाची लागण जूनच्या सुरुवातीस केली होती.
--------------------
उद्धट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार
जत : जत पंचायत समितीच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी सदस्यांनी पाठविलेल्या पत्रांना दाद देत नाहीत, ती स्वीकारली जात नाहीत. जिल्हा परिषद कार्यालयात पाठवावीत, अशी सूचना केली जात आहे. असे उद्धट वर्तन करून सदस्यांच्या पत्राची अवहेलना करून विकास कामांत आडकाठी आणणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असा ठराव जत पंचायत समिती मासिक बैठकीत करण्यात आला. सभापती मनोज जगताप अध्यक्षस्थानी होते.
--------------------------------------
पणुंब्रे वारुण येथे ट्रॅक्टर पलटी
चरण : पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथील धोकादायक वळणावर शुक्रवारी सकाळी उसाचा ट्रॅक्टर उलटला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वळणावर अनेकदा अपघात होऊन काहीजणांचे प्राण गेले आहेत. यामुळे हे धोकादायक वळण काढण्यासाठी अनेकदा नागरिकांनी मागणी केली आहे; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे आता आणखी बळी गेल्यावर याकडे प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
-----------------------------------
कुपवाडला मटकाबुकीचा अड्डा उद्ध्वस्त
सांगली : कुपवाड (ता. मिरज) येथील मटका बुकीच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून रोख रकमेसह २ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बुकीचालकासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांत बुकीचालक झाकीर बाबासाहेब मुजावर (वय ४८, रा. बसस्थानकाजवळ, कुपवाड), शकील नसीसाब ढोले (३४, उल्हासनगर), रज्जब मुसा मुजावर (३६, समतानगर), भीमराव बाबूराव शिंदे (६६, समतानगर), दशरथ रामचंद्र जावळे (६०, रा. समतानगर), नासीर कासीम मुश्रीफ (४२, रा. मुजावर गल्ली, मिरज) या सहाजणांचा समावेश आहे.
---------------------------------
दुधोंडीत विनापरवाना कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन
सांगली : दुधोंडी (ता. पलूस ) येथे रविवारी (दि. ६) युवा कबड्डी लीग स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पण त्यासाठी राज्य कबड्डी असोसिएशनची परवानगी नाही. त्यामुळे कबड्डीपटूंनी सहभागी होऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर पाटील व जिल्हा सचिव नितीन शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, स्पर्धेत सहभागासाठी प्रत्येकी ५०० रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्याचा हेतू असल्याचा दावा पाटील यांनी केला. संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ घोडके यावेळी उपस्थित होते.