मिरज तालुक्यात भाजपकडे ४ तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडे प्रत्येकी ३ ग्रामपंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:29+5:302021-01-19T04:28:29+5:30

भाजपला म्हैसाळ, विजयनगर, लिंगनूर, अंकली या चार गावात स्पष्ट बहुमत मिळाले. कवलापूर, मल्लेवाडी, शिपूर येथे राष्ट्रवादी व भोसे, तानंग, ...

In Miraj taluka, BJP has 4 Gram Panchayats and Congress-NCP has 3 Gram Panchayats each | मिरज तालुक्यात भाजपकडे ४ तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडे प्रत्येकी ३ ग्रामपंचायती

मिरज तालुक्यात भाजपकडे ४ तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडे प्रत्येकी ३ ग्रामपंचायती

भाजपला म्हैसाळ, विजयनगर, लिंगनूर, अंकली या चार गावात स्पष्ट बहुमत मिळाले. कवलापूर, मल्लेवाडी, शिपूर येथे राष्ट्रवादी व भोसे, तानंग, कळंबी या तीन ग्रामपंचायतीत काँग्रेसला बहुमत मिळाले. १२ गावात सर्वपक्षीय स्थानिक आघाड्यांनी सत्ता मिळविली. म्हैसाळ ग्रामपंचायतीचा निकाल राष्ट्रवादीसाठी धक्कादायक ठरला. भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे व पंचायत समिती उपसभापती दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला १७ पैकी १५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित पॅनेलला केवळ दोन जागा मिळाल्या.

मालगावात सत्ताधारी भाजपच्याच दोन गटांत निवडणूक झाली. भाजपचे काकासाहेब धामणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला ८ व प्रदीप सावंत यांच्या पॅनेलला ८ तर जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचे आप्पासाहेब हुळ्ळे यांच्या पॅनेलला एक जागा मिळाली. येथे सावंत व हुळ्ळे गट एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणूकीत प्रदीप सावंत यांचा व हुळ्ळे यांच्या पुत्राचा पराभव झाला.

आरगमध्ये भाजपला ८ जागा मिळाल्या असून विरोधी गटालाही ८ जागा मिळाल्या. यामुळे निवडून आलेल्या एका अपक्षाच्या हातात सत्ता स्थापनेची सूत्रे आहेत. येथे भाजपच्या पंचायत समिती सदस्या सुनीता पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदा पाटील यांचा पराभव झाला. एरंडोली ग्रामपंचायतीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गटातच निवडणूक झाली. जय जान्हवी पॅनेलला ८ व श्री जान्हवी पॅनेलला ९ जागा मिळाल्या. माजी सरपंच आनंदा भोई विजयी झाले. उपसरपंच बाबगोंडा पाटील पराभूत झाले.

शिंदेवाडी ग्रामपंचायतीत तीस वर्षांनंतर सत्तांतर झाले. येथे अ‍ॅड. सचिन पाटील गटाला ९ व विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या. मल्लेवाडीतही सत्तांतर झाले. येथे दरुरे गटाला ११ जागा मिळाल्या. विजयनगर (म्हैसाळ) येथे जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे व राजू कोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्व नऊ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. लिंगनूर येथे भाजपप्रणित शेतकरी ग्रामविकास पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले. शिंदेवाडीत जय हनुमान परिवर्तन पॅनेल या स्थानिक आघाडीने ८ जागांवर विजय मिळवित राष्ट्रवादीकडून सत्ता हस्तगत केली.

चाैकट

भाजपवर जनतेचा विश्वास अधाेरेखित

मिरज तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे केंद्र सरकारचे उत्तम काम, देशाच्या विकासासाठी घेतलेले ठोस निर्णय, राष्ट्रप्रेमाचा पुरस्कार, भ्रष्टाचारमुक्त कारभार याचा विजय आहे. जनतेने भाजपवर विश्वास ठेवून भाजपाकडे सत्ता सोपविली आहे, त्या विश्वासास पात्र राहून भाजपाची कामगिरी होईल अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हा अध्यक्ष दीपक शिंदे यांनी दिली.

Web Title: In Miraj taluka, BJP has 4 Gram Panchayats and Congress-NCP has 3 Gram Panchayats each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.