मिरज सुधार समितीने अधिकाऱ्यांच्या नावे रस्त्यावरील खड्ड्यात केले वृक्षरोपण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 02:26 PM2021-06-17T14:26:42+5:302021-06-17T14:27:31+5:30

Miraj : आंदोलनाची दखल घेत महापालिकेने लागलीच रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरूवात केली.

Miraj sudhar Committee planted trees in the potholes in the name of the officers | मिरज सुधार समितीने अधिकाऱ्यांच्या नावे रस्त्यावरील खड्ड्यात केले वृक्षरोपण

मिरज सुधार समितीने अधिकाऱ्यांच्या नावे रस्त्यावरील खड्ड्यात केले वृक्षरोपण

Next

मिरज : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. नवीन रस्ता होईपर्यंत रस्त्यावरील खड्डे मुजविण्याबाबत सूचना करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका अधिकारी लोकप्रतिनिधींचे सुद्धा ऐकत नसल्याच्या निषेधार्थ मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी चौकातील खड्ड्यात अधिकाऱ्यांच्या नावे झाडे लावून बोंबाबोंब आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत महापालिकेने लागलीच रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरूवात केली.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मिरज शहर सुधार समितीने अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर आमदार सुरेश खाडे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २९ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. काम सुरू होण्यास किमान सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे. पावसाळ्यात किमान खड्डे मुजवून रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्याची मागणी मिरज शहर सुधार समितीने खासदार संजयकाका पाटील व  आमदार खाडे यांच्याकडे केली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका अधिकारी लोकप्रतिनिधींच्या सुचनांना केराची टोपली दाखवत असल्याने संतप्त झालेल्या मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांच्या नांवे बोंबाबोंब आंदोलन केले. 

आंदोलनात समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, मुस्तफा बुजरूक, धनराज सातपुते, बाळासाहेब पाटील, विराज कोकणे, बंडू शेटे, विलास देसाई, किरण बुजगडे, प्रा. विजय धुमाळ, श्रीकांत महाजन, असिफ निपाणीकर, राकेश तामगावे, संतोष माने, अनिल देशपांडे, सचिन गाडवे, शाहिद सतारमेकर, जहिर मुजावर, झोहेब मुल्ला, इम्रान मर्चंट, जावेद शरिकमसलत, मंदार वसगडेकर, रविंद्र कांबळे, इकबाल भालदार, विजय मगदूम, सौ. सुनीता कोकाटे, सौ. गीतांजली पाटील, सौ. रूपाली गाडवे आदीसह मिरजकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून तात्काळ खड्डे मुजविण्याचे काम सुरू केले.

Web Title: Miraj sudhar Committee planted trees in the potholes in the name of the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली