मिरज रेल्वे स्थानकाला आता टॅँकरने पाणी

By Admin | Updated: May 23, 2016 00:17 IST2016-05-22T22:50:46+5:302016-05-23T00:17:16+5:30

वारणेच्या पाण्याची प्रतीक्षा : लातूरला पाणीपुरवठा करणारी हैदरखान विहीर कोरडी

Miraj railway station can now water the tanker | मिरज रेल्वे स्थानकाला आता टॅँकरने पाणी

मिरज रेल्वे स्थानकाला आता टॅँकरने पाणी

मिरज : वारणा धरणातून सोडलेले पाणी अद्याप मिरजेपर्यंत पोहोचले नसल्याने म्हैसाळ योजना व मिरजेतून लातूरला रेल्वेने होणारा पाणी पुरवठा दुसऱ्या दिवशीही बंद होता. वारणा धरणातील पाणी येण्याची प्रतीक्षा सुरू असून, सोमवारी नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा झाल्यास म्हैसाळ योजनेचे पंप व जलदूत एक्स्प्रेस पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईची झळ आता मिरजेच्या रेल्वेस्थानकावरही जाणवत आहे. त्यामुळे याठिकाणी रविवारी टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावल्याने गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद झाले आहेत. ‘म्हैसाळ’च्या पहिल्या टप्प्यातील पंपगृहाच्या पंधरा पंपांद्वारे पाणी उपसा करण्यात येत असल्याने म्हैसाळ बंधाऱ्यात आठ फूट पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ नदीपात्र कोरडे असल्याने, रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा शुक्रवारपासून बंद झाला आहे. पाणी उपसा थांबल्याने गेले चाळीस दिवस दररोज लातूरला पाणी घेऊन जाणारी जलदूत एक्स्प्रेस थांबली आहे.
सोमवारी नदीपात्रात पाणी आल्यास मंगळवारी जलदूत एक्स्प्रेस लातूरला जाण्याची शक्यता आहे. नदीपात्रात पाणीसाठा होण्यासाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र पाण्याचा विसर्ग कमी असल्याने अद्याप मिरजेपर्यंत पाणी आलेले नाही. कर्नाटकसाठी कोयनेतून पाणी सोडल्यानंतर नदीपात्रातील पाणीसाठा कमी होऊन म्हैसाळ योजना बंद पडल्याने म्हैसाळचे पंप कधी सुरु होणार, याची प्रतीक्षा सुरु आहे. पाण्याअभावी लातूरला होणारा पाणीपुरवठा बंद करून मिरज रेल्वे स्थानक व रेल्वे वसाहतीसाठी एका मोटारीद्वारे उपसा केला जात आहे.
हैदरखान विहिरीतही पाणी नसल्याने रेल्वे स्थानकात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रेल्वे गाड्यांत कसेबसे पाणी भरण्यात येत असून प्लॅटफॉर्मवरील नळाचे पाणी बंद झाले आहे. (वार्ताहर)

मिरज रेल्वे स्थानकातील एका टाकीत रविवारी टॅँकरने पाणी भरण्यात आले.

Web Title: Miraj railway station can now water the tanker