मिरज पंचायत समिती सभेत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST2021-05-01T04:26:13+5:302021-05-01T04:26:13+5:30
मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे व गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन ...

मिरज पंचायत समिती सभेत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे
मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे व गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पार पडली. सभेत कत्तलखाना सुरू असल्याबद्दल महापालिकेच्या कारभारावर संतप्त सदस्यांनी हल्ला चढविला.
नागरिकांच्या आरोग्याची पर्वा न करता महापालिकेने कत्तलखाना सुरूच ठेवणे निषेधार्ह असल्याचे उपसभापती अनिल आमटवणे, विक्रम पाटील यांनी सांगितले. महापालिकेच्या बेजबाबदार कारभाराविरोधात आंदोलने करूनही कत्तलखाना सुरूच राहणार असेल, तर न्यायालयात यासाठी दाद मागणार असल्याचे किरण बंडगर यांनी सांगितले. रेमडिसिवरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी विक्रम पाटील यांनी केली.
सांगली- विटा राज्य मार्ग माधवनगर, बुधगाव, कवलापूर या गावांतून जातो. गावात अनेक वळणे असल्याने अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या तीनही गावांतील वळणालगत वाहनांच्या वेगमर्यादेसाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधकाची मागणी विक्रम पाटील यांनी केली. मिरज- सलगरे या राज्यमार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. रस्ता खोदल्याने अपघात होत असल्याने रस्त्याचे काम जलद पूर्ण करण्याची मागणी किरण बंडगर यांनी केली. हरिपूर येथे जलवाहिनीसाठी ठेकेदाराने विनापरवाना खुदाई करून रस्त्याचे नुकसान केले असल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाईची मागणी अशोक मोहिते यांनी केली.
चौकट
उपचाराबद्दल गैरसमज दूर करा
कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा राबत असली तरी कोरोना उपचाराबाबत रुग्ण व नातेवाइकांत अनेक गैरसमज आहेत.
हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासनाने कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्हीच्या निगराणीखाली उपचारव्यवस्था करण्याची मागणी कृष्णदेव कांबळे यांनी केली.