मिरज-कुर्डूवाडी पॅसेंजर धावणार आता आठऐवजी बारा डब्यांसह

By Admin | Updated: June 8, 2015 00:49 IST2015-06-07T23:33:01+5:302015-06-08T00:49:55+5:30

प्रवाशांची सोय : रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत

Miraj-Kurduvadi passenger will run now with eight coaches instead of eight | मिरज-कुर्डूवाडी पॅसेंजर धावणार आता आठऐवजी बारा डब्यांसह

मिरज-कुर्डूवाडी पॅसेंजर धावणार आता आठऐवजी बारा डब्यांसह

मिरज : मिरज-कुर्डूवाडी पॅसेंजरला आता चार जादा डबे जोडण्यात आले आहेत. आठऐवजी बारा डब्यांसह ही पॅसेंजर आता धावत असल्याने पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. मिरज-कुर्डूवाडी, मिरज-बेळगाव, मिरज-कोल्हापूर, कोल्हापूर-पुणे, मिरज-लोंढा या पॅसेंजर गाड्यांना मोठी गर्दी आहे. मात्र या गाड्यांना केवळ आठच डबे असल्याने प्रवाशांची खचाखच गर्दी होते. वाढत्या गर्दीमुळे वृद्ध महिला व प्रवाशांची मोठी गैरसोय होत असतानाही रेल्वे प्रशासनाने पॅसेंजरचे डबे वाढविण्याच्या मागणीची दखल घेतलेली नव्हती. मिरज-पंढरपूर मार्गावर पॅसेंजरमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वारकऱ्यांसाठी पॅसेंजरचे डबे अपुरे पडतात. यामुळे मिरज-कुर्डूवाडी पॅसेंजरला चार जादा डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मिरजेतून दररोज सकाळी सहा वाजता सुटणाऱ्या कुर्डूवाडी पॅसेंजर १ जूनपासून बारा डब्यांसह धावत आहे. कुर्डूवाडी पॅसेंजरला जोडण्यात आलेले चार जादा डबे कायम राहणार असल्याचे मिरज रेल्वेस्थानक अधीक्षक एस. व्ही. रमेश यांनी सांगितले. कुर्डूवाडी पॅसेंजरचे डबे वाढविण्याच्या निर्णयाचे रेल्वे प्रवासी संघटनांनी स्वागत केले असून प्रवाशांच्या सोयीसाठी अन्य पॅसेंजर रेल्वे गाड्यांचेही डबे वाढविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)

इंजिन बंद पडल्याने विलंब
कऱ्हाड स्थानकात लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुबळी या एक्स्प्रेस रेल्वेचे इंजिन बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. मिरजेतून इंजिन पाठविण्यात आल्यानंतर दोन तास विलंबाने हुबळी एक्स्प्रेस रवाना झाली. कुर्ला ते हुबळीस जाणारी एक्स्प्रेस शनिवारी सायंकाळी कऱ्हाड स्थानकात आल्यानंतर इंजिन बंद पडले. एक्स्प्रेसला मोठी गर्दी असताना इंजिन बंद पडल्याने प्रवासी हैराण झाले होते. इंजिन दुरुस्तीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने मिरजेतून पर्यायी इंजिनची व्यवस्था करण्यात आली. मिरजेतून तब्बल दीड तासानंतर कऱ्हाड येथे इंजिन पोहोचल्यानंतर हुबळी एक्स्प्रेस मिरजेकडे मार्गस्थ झाली. रेल्वे इंजिन दुरुस्तीसाठी मिरजेत व्यवस्था नसल्याने नादुरुस्त इंजिन दुरुस्तीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले.

Web Title: Miraj-Kurduvadi passenger will run now with eight coaches instead of eight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.