मिरज हायस्कूलचा वाद न्यायालयात जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2015 00:10 IST2015-11-30T23:07:08+5:302015-12-01T00:10:49+5:30
महापौरांच्या निर्णयाला विरोध : महासभेत जाब विचारण्याची तयारी

मिरज हायस्कूलचा वाद न्यायालयात जाणार
सांगली : मिरज हायस्कूलच्या अध्यक्ष पदाचा वाद वाढतच चालला आहे. महापौर विवेक कांबळे यांनी बेकायदेशीररित्या अध्यक्ष पदावर हक्क सांगितल्याचा दावा करीत माजी अध्यक्ष बसवेश्वर सातपुते यांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे, तर महापौरविरोधी गटाने महासभेत कांबळे यांना जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मिरज हायस्कूलवर महापालिकेचे नियंत्रण आहे. या हायस्कूलच्या स्कूल कमिटीवर पालिकेच्या नगरसेवकांची वर्णी लावली जाते, तर महापौर हे स्कूल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. काही अपवाद वगळता महापौरांव्यतिरिक्त अन्य नगरसेवकांकडे अध्यक्षपद दिले जाते. फेब्रुवारी महिन्यात महापौर निवडीवेळी विवेक कांबळे व बसवेश्वर सातपुते यांच्यात चुरस होती. पण कांबळे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी बसवेश्वर सातपुते यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मिरज हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे अध्यक्षपद दिले होते.
गेले अकरा महिने सातपुते अध्यक्ष पदाचा कारभार सांभाळत आहेत. आठ दिवसांपूर्वी सातपुते यांची उचलबांगडी करून महापौर कांबळे यांनी अध्यक्ष पदाची धुरा स्वत:कडे घेतली. पण त्याची माहिती सातपुते यांना नव्हती. या कमिटीतील सदस्य अतहर नायकवडी, निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे यांनाही अध्यक्ष बदलाबाबत धक्का बसला. दरम्यान, महापौरांच्या या निर्णयाविरोधात सत्ताधारी गटात असंतोष पसरला आहे. सातपुते यांना अध्यक्ष पदावरून हटविण्याचा ठराव करण्यात आलेला नाही. त्यावर सत्ताधारी गटात कोणतीही चर्चा झालेली नाही. असे असताना सातपुते यांना हटवून महापौरांनी अध्यक्षपदाची सूत्रे कशी हाती घेतली, असा सवालही उपस्थित होत आहे. याबाबत सातपुते यांनी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. महापौरविरोधी गटाने तर महासभेत कांबळे यांना जाब विचारण्याची तयारी चालविली आहे. (प्रतिनिधी)
तडजोडीसाठी सारे काही!
मिरज हायस्कूलमध्ये शिक्षक भरतीचा वाद न्यायालयात गेला होता. हा वाद तडजोडीने मिटविण्यात आला. या शिक्षकांना कामावर हजर करून घेण्यात आल्याचे समजते. त्यात मोठा अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोपही सत्ताधारी गटातून होऊ लागला आहे. त्यासाठी महापौरांनी ऐनवेळी सातपुते यांची उचलबांगडी करून स्वत:कडे अध्यक्षपद घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.