वाहतूक बंदमुळे मिरज आगाराला २० कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:17+5:302021-06-03T04:19:17+5:30
सदानंद औंधे मिरज : लाॅकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने मिरजेतून दररोज ३८ हजार किमी एसटीच्या ...

वाहतूक बंदमुळे मिरज आगाराला २० कोटींचा फटका
सदानंद औंधे
मिरज : लाॅकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने मिरजेतून दररोज ३८ हजार किमी एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. वार्षिक साडेबारा कोटी रुपये तोट्यात असलेल्या मिरज आगाराला लाॅकडाऊनमुळे गतवर्षी २० कोटी तोटा झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ मे पासून राज्य परिवहन मंडळाची जिल्ह्यातील सर्व आगारांतून एसटी सेवा बंद आहे. मिरज आगारातून जिल्हांतर्गत, परराज्य व परजिल्ह्यात दररोज एकूण ४५० फेऱ्या व शहरी व ग्रामीण भागात दररोज ३८ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक होते. आता २६ दिवसांच्या बंदनंतर १ जूनपासून मिरज आगारातून केवळ इचलकरंजी व कोल्हापूरसाठी दोन फेऱ्या सुरू झाल्या आहेत. उद्यापासून मिरज ते पुणे एसटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.
बसवाहतूक बंद झाल्याने सुमारे ४८० कर्मचारी व १०३ बसेस असलेल्या मिरज आगारात सद्या कार्यशाळेत गाड्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. मिरज आगाराचे दररोज १२ लाख उत्पन्न असून, एप्रिल, मे महिन्यांत सुटीच्या हंगामात दररोज १५ लाख रुपये उत्पन्न मिळते. मात्र गतवर्षी व यावर्षी लाॅकडाऊनमुळे ऐन हंगामातच एसटीची चाके थांबल्याने आगाराचे कामकाज ठप्प आहे. मिरज स्थानकात दररोज सुमारे पाचशे बसेस ये-जा करतात. कर्नाटकातील अथणी, चिकोडी, जमखंडी, विजापूर, बागलकोट या शहरांतून कर्नाटक एसटी मोठ्या संख्येने मिरजेत येत असल्याने मिरज बसस्थानकात दररोज बसेसची मोठी गर्दी असते. मात्र, एसटी वाहतूक बंद असल्याने मिरज बस स्थानकात शुकशुकाट आहे. मिरज एसटी आगार वार्षिक सुमारे साडेबारा कोटी रुपये तोट्यात होते. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे तोट्यात आणखी वाढ होऊन १९ कोटी ९२ लाखांचा तोटा झाला आहे. बसवाहतूक बंद असल्याने स्थानकातील विविध व्यवसाय करणारे विक्रेते, हमालांचाही रोजगार बुडाला आहे.
चाैकट
लाॅकडाऊन निर्बंधांत सवलत मिळाल्यानंतर २६ दिवसांनंतर मिरज आगारातून पुन्हा एसटी वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने काही ठराविक मार्गावरच फेऱ्या सुरू झाल्या आहेत. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार एसटी फेऱ्या सुरू होणार आहेत.