मिरजेत रेल्वे इंजिन घसरले
By Admin | Updated: June 3, 2016 00:48 IST2016-06-02T23:19:22+5:302016-06-03T00:48:48+5:30
मोठा अपघात टळला : बेळगाव मार्गावरील वाहतूक ठप्प

मिरजेत रेल्वे इंजिन घसरले
मिरज : मिरज रेल्वेस्थानकात गुरुवारी सकाळी हुबळी-मिरज लिंक एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्याने बेळगाव मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. रेल्वेमार्ग तुटल्यामुळे इंजिन घसरल्याचा अंदाज असून, रेल्वे प्रशासनाकडून अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दहा बोगी असलेली हुबळी-बेल्लारी-मिरज लिंक एक्स्प्रेस (क्रमांक ११०४८) सकाळी ५.४० वाजता मिरज स्थानकात प्रवेश करीत असताना उड्डाणपुलाजवळ वळणावर इंजिनची दोन चाके घसरली. यामुळे जोरदार धक्का बसून एक्स्प्रेस जागेवर थांबली. वळणावर एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. जोरदार धक्कयानंतर अचानक रेल्वे थांबल्याने प्रवाशांत गोंधळ उडाला. रेल्वेच्या मदत पथकाने घसरलेले इंजिन क्रेनच्या साहायाने उचलून रेल्वेमार्गाची दुरूस्ती केली. अपघातामुळे मिरज-बेळगाव मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. मिरज-बेळगाव पॅसेंजर, हुबळी-कुर्ला चालुक्य एक्स्प्रेसला विलंब झाला. सकाळी नऊ वाजता वाहतूक पूर्ववत झाली.
रेल्वे घसरल्याच्या घटनेमुळे सहायक विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देवस्कर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिरजेला भेट देऊन पाहणी केली. रेल्वे चालक व रेल्वे मार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना पुणे येथे चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. (वार्ताहर)
अपघाताची चौकशी : एम. व्ही. रमेश
मिरजेतील अपघातामुळे अडकलेली लिंक एक्स्प्रेस मिरज-लोंढा पॅसेंजर म्हणून रवाना करण्यात आली. रेल्वे रूळांना तडा गेला असल्याने इंजिन घसरले असून, अपघाताची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे स्थानक अधीक्षक एम. व्ही. रमेश यांनी सांगितले.