इस्लामपुरात डॉल्बीमुक्त वातावरणात मिरवणुका

By Admin | Updated: September 9, 2014 23:49 IST2014-09-09T23:16:56+5:302014-09-09T23:49:04+5:30

गणरायाला निरोप : पारंपरिक वाद्यांचा गजर, महिलांच्या अपूर्व उत्साहात शांततामय वातावरणात विसर्जन

Mirabana in Dolby free environment in Islampura | इस्लामपुरात डॉल्बीमुक्त वातावरणात मिरवणुका

इस्लामपुरात डॉल्बीमुक्त वातावरणात मिरवणुका

इस्लामपूर : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’ अशी साद घालत शहर व परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. बँजो, नाशिक ढोल व झांजपथकांच्या निनादात निघालेल्या या विसर्जन मिरवणुका अत्यंत शांततेत व शिस्तीचे पालन करुन काढण्यात आल्या. प्रत्येक मंडळाच्या मिरवणुकीतील महिला-मुलींचा सहभाग व डॉल्बीला फाटा हे यंदाच्या विसर्जन सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.
शहरात जवळपास ९० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा श्री गजाननाच्या विविध भावमुद्रांमधील मूर्र्तींची प्रतिष्ठापना केली होती. साथीदार गणेशोत्सव मंडळाची सर्वात उंच १० फुटांची गणेशमूर्ती लक्षवेधी ठरली. ‘इस्लामपूरचा महाराजा’ची सिंहासनारुढ मूर्ती, भाजी मंडईतील मंडळाची गरुड रूपातील, तसेच लोकनेते राजारामबापू मंडळाची आकर्षक मूर्ती, लाल चौकातील सिध्दिविनायक मंडळाच्या मिरवणुकीचे संचलन अत्यंत संयमित, पण उत्साहाने भारलेले होते.
महादेवनगर गणेश मंडळाच्या मिरवणुकीस ११ वाजता प्रारंभ झाला. सायंकाळी ६ वाजता बोरगावच्या कृष्णा नदीत श्रींचे विसर्जन करण्यात आले. या मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. तसेच महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
शिवाजी, रेणुका, बालशनी, बालगणेश, सिध्दनाथ, आदर्श, एम. डी. पवार साहेब, अष्टविनायक, तिरंगा, नरवीर तानाजी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यासह इतर मंडळांच्या मिरवणुकाही जल्लोषात काढण्यात आल्या.
प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते जुन्या तहसील कचेरीसमोरील चौकात गणेशभक्त जल्लोष करीत होते. मिरवणुकीतील सहभागी महिला, मुली कधी पिंगा, तर कधी झिम्मा-फुगडीचा फेर धरत होत्या.
शिवनगरातील नवनाथ गणेश मंडळाच्या मिरवणुकीत महिला— मुलींनी विविध कलागुणांचे प्रदर्शन घडवले. या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या. मिरवणूक मार्गावर पोलिसांसह गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व मंडळांच्या मिरवणुका शांततेत पार पडल्या. (वार्ताहर)

पाटील मंडळाला शिस्तबध्द मिरवणुकीचा मान
इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील युगपुरुष संत ज्ञानू बाबाजी पाटील मंडप मंडळाने शिस्तबध्द मिरवणुकीसाठीचा प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. मऱ्हाठमोळा युवक मंडळातर्फे दरवर्षी शिस्तबध्द मिरवणूक स्पर्धा घेतल्या जातात. मिरवणुकीतील शिस्त, साधेपणा, उत्सवाचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवणे या निकषांनुसार या स्पर्धेचे परीक्षण होते. त्यामध्ये ज्ञानबा-तुकोबांचे विचार समाजाच्या सर्व थरात रुजवण्याचे कार्य संत ज्ञानू बाबाजी पाटील मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतून होते. अभंगाच्या तालावर तल्लीन होऊन नाचणारे वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या मंडळास तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव अ‍ॅड. धैर्यशील पाटील, राम कोल्हापुरे यांच्याहस्ते श्रीफळ व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील, राकेश पाटील, मृदंगमणी गजानन पाटील, वैभव पाटील उपस्थित होते.

विसर्जन मिरवणुकीवेळी पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांवर पडणारा ताण लक्षात घेऊन येथील अहिंसा सार्वजनिक मंडळातर्फे पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांना पोळी-भाजी आणि पाण्याची बाटली, अशा स्वरुपात अन्नदान करण्यात आले. उद्योगपती प्रकाशभाई शहा, दिनेश पोरवाल, पोलीस निरीक्षक संजय पाटील, हवालदार सुनील तुपे, राहुल राठोड, जितेंद्र ढबू यांनी संयोजन केले.

Web Title: Mirabana in Dolby free environment in Islampura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.