अल्पसंख्याक शिष्यवृत्ती राज्यस्तरीय पथकाची शाळांना भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:22+5:302021-02-05T07:21:22+5:30
सांगली : अल्पसंख्याक शिष्यवृत्ती राज्यस्तरीय पथकाने महापालिका क्षेत्रातील काही शाळांची अचानक तपासणी केली. शिष्यवृत्तीसाठी अर्जाच्या छाननीत बोगस ...

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती राज्यस्तरीय पथकाची शाळांना भेट
सांगली : अल्पसंख्याक शिष्यवृत्ती राज्यस्तरीय पथकाने महापालिका क्षेत्रातील काही शाळांची अचानक तपासणी केली. शिष्यवृत्तीसाठी अर्जाच्या छाननीत बोगस विद्यार्थी आढळल्याने पथकाने फेरपडताळणीसाठी तपासणी सुरू केल्याचे सांगण्यात आले.
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती नवीन व नूतनीकरणाचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम शाळांनी पूर्ण करून पाठविले आहेत. या अर्जात त्रुटी असून बोगस विद्यार्थी आढळल्याने राज्यस्तरावरून पुन्हा शाळास्तरावर फेरपडताळणीसाठी पाठविले आहे. या कामाची पडताळणी करण्यासाठी राज्यस्तरीय कमिटीने सांगलीतील शाळांना भेट दिली. अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षणचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी बी.एम. कासार, राधानगरी व कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्र. उपशिक्षण अधिकारी जी.टी. पाटील यांच्या पथकाने ऑनलाइन भरलेल्या अर्जांची तपासणी केली.
ऑनलाइन अर्ज भरत असताना चुकीची माहिती भरल्यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो. पासवर्ड व लॉगीन आयडीचा गैरवापर करून काही बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाऊ शकते. त्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे अर्ज शाळास्तरावरून पाठविताना आपल्या शाळेतीलच विद्यार्थी आहे, याची खात्री करावी, अशा सूचना क्षीरसागर यांनी दिल्या. यावेळी पथकासोबत माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, प्र. शिक्षणाधिकारी निरंतरचे महेश धोत्रे, महापालिकेचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार आदी सहभागी होते.