बुधगावात जोतिबानगरमध्ये खणीचे पाणी शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:05+5:302021-09-17T04:31:05+5:30
बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील जोतिबानगर वसाहतीमध्ये शेजारील खणीचे पाणी शिरले असून, सखल भागात पाणी साचले ...

बुधगावात जोतिबानगरमध्ये खणीचे पाणी शिरले
बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील जोतिबानगर वसाहतीमध्ये शेजारील खणीचे पाणी शिरले असून, सखल भागात पाणी साचले आहे. या पाण्याचा तातडीने निचरा करुन, येथील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
बुधगावात कर्नाळ रस्त्यावर जोतिबानगर शेजारी सुमारे दोन हेक्टर क्षेत्रावर चाळीस फूट खोलची खण आहे. या खणीत पावसाचे पाणी भरते. खणीशेजारीच जोतिबानगर वसाहत आहे. याठिकाणी ग्रामपंचातीच्या नळपाणी योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातील अशुद्ध पाणी या खणीत सोडले जाते. पावसाच्या पाण्यासोबतच या पाण्यामुळे खण तुडूंब भरली आहे. मागील दोन दिवसांपासून पाणी जोतिबानगर वसाहतीत पसरु लागले आहे. वसाहतीतील सखल भाग पाण्याने व्यापला आहे. जलशुद्धीकरण केंद्र, वीज उपकेंद्रा समोरही पाणी साचून राहिले आहे.
या पाण्याचा निचरा करण्यासाठी वसंतदादा कारखान्याच्या जुन्या जलवाहिनीमधून पाणी ओढ्यात सोडण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने सुरु केला आहे. मात्र त्याचे काम संथगतीने सुरु आहे. पाणी आणखी वाढल्यास वसाहतीतील घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी निचऱ्याचे काम तातडीने सुरु करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.