मायथळला विजेच्या धक्क्याने गिरणी चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:04+5:302021-03-30T04:17:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : मायथळ (ता.जत) येथे पिठाच्या गिरणीची साफसफाई करत असताना, विजेचा धक्का बसून पांडुरंग इराप्पा ...

मायथळला विजेच्या धक्क्याने गिरणी चालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : मायथळ (ता.जत) येथे पिठाच्या गिरणीची साफसफाई करत असताना, विजेचा धक्का बसून पांडुरंग इराप्पा भुसनूर (वय ५०) या गिरणी चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी सुरेखा (४५) गंभीर जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी अकराच्या सुमारास घडली.
मायथळ ते माडग्याळ रस्त्यावर पांडुरंग, पत्नी सुरेखा, मुलगा व दोन मुली यांच्यासोबत रहात होते. त्यांचा पिठाची गिरणी, चटणी कांडप यंत्र व किराणा दुकान असा व्यवसाय आहे. शनिवारी दुपारी सुरेखा पिठाच्या गिरणीची साफसफाई करत असताना, त्यांना अचानक विजेचा धक्का बसला. त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर, पत्नीला वाचविण्यासाठी पांडुरंग गेले. तेथील वीजवाहक तार बाजूला करत असताना, त्यांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरेखा यांच्यावर माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेची नोंद जत पोलिसात झाली असून, पुढील तपास सुरू आहे.