‘मायणी बँक’ बिनविरोध!
By Admin | Updated: June 16, 2016 01:07 IST2016-06-15T23:44:52+5:302016-06-16T01:07:12+5:30
सुरेंद्र गुदगे गटाची सत्ता कायम : शेवटच्या दिवशी सचिन गुदगे गटाचे आठ अर्ज मागे

‘मायणी बँक’ बिनविरोध!
मायणी : मायणी अर्बन बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उच्च न्यायालयात सुनावणीसाठी असलेले सचिन गुदगेंसह २३ जणांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर उर्वरित अर्ज बुधवारी मागे घेतल्याने अत्यंत उत्सुकता लागलेली बॅँकेची निवडणूक अखेर बिनविरोध झाल्यामुळे सत्ताधारी सुरेंद्र गुदगे गटाची सत्ता कायम राहिली.
दि मायणी अर्बन बॅँकेची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन गुदगे यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. तो ही आपल्या थोरल्या बंधूंच्या विरोधातच.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुरेंद्र गुदगे व सचिन गुदगे यांचे दोन स्वतंत्र राजकीय गट तयार झाले. निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या वेळी दोन्ही गटांकडून हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्या नंतर निवडणूक निर्णय अधिकारी काणे यांनी सचिन गुदगेंसह २३ जणांचे अर्ज अवैध ठरविले. तद्नंतर त्यांनी आयुक्तांकडे धाव घेतल्यानंतर आयुक्तांनी हा निर्णय कायम केल्यानंतर त्यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही ठिकाणच्या निर्णयाचा अभ्यास करून बुधवारी उच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी व आयुक्तांना निर्णय कायम करीत सचिन गुदगेंसह २३ जणांचे अर्ज अवैध ठरविलेला निर्णय कायम केला.बुधवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. या वेळी सचिन गुदगे गटाच्या सहा जणांचे आठ अर्ज शिल्लक होते. ते ही अर्ज सचिन गुदगे व कार्यकर्त्यांनी मागे घेतल्यामुळे १७ जागांसाठी १७ अर्ज शिल्लक राहिल्यामुळे ही निवडणूक बुधवारी बिनविरोध झाली. सत्ताधारी सुरेंद्र गुदगे यांच्याकडे पुन्हा एकदा मायणी अर्बन बॅँकेची सूत्रे गेली आहेत. (वार्ताहर)