लिंगनूर शाखा कालव्यातून ‘म्हैसाळ’चे पाणी खळाळले
By Admin | Updated: April 13, 2015 00:01 IST2015-04-12T23:36:06+5:302015-04-13T00:01:10+5:30
शेतकऱ्यांची बैठक : आठवड्यात जानराववाडी, खटावला आवर्तन

लिंगनूर शाखा कालव्यातून ‘म्हैसाळ’चे पाणी खळाळले
प्रवीण जगताप - लिंगनूर -सुरुवातीला म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर योजनेचे आवर्तन फक्त मुख्य कालव्यातून होईल, असे सांगण्यात येत होते. परंतु लिंगनूर येथील शेतकऱ्यांची पाण्याच्या मागणी अर्जातील सकारात्मकता पाहून शाखा कालव्यांतूनही पाणी सोडण्याबाबत रविवारी निर्णय घेण्यात आला. लिंगनूर परिसरातील शेतकऱ्यांनीही शाखा व उपकालव्यांतून पाणी सोडणार असाल तर अर्ज भरू, अशी भूमिका घेऊन या संबंधित कालव्यावरील ४०० हेक्टर क्षेत्राचे अर्ज भरल्याने आज सकाळनंतर म्हैसाळचे पाणी लिंगनूर शाखा कालव्यांतून सोडण्यात येत आहे. या मागणी अर्जाबाबत व वितरणाच्या नियोजनाबाबत आज लिंगनूरमध्ये कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी लिंगनूर, संतोषवाडी, खटाव, आरग, माळवाडी परिसरातील शेतकरी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आज म्हैसाळ योजनेचे आवर्तन आरग, माळवाडी, गायकवाडवाडी, लिंगनूर शाखा कालवा, मन्सूरवाडी भागातील कालव्यांत पाणी सोडले आहे. तसेच लिंगनूर परिसरातील ४०० हेक्टर क्षेत्राचे मागणी अर्ज जमा करण्यात आले. आजच्या बैठकीत आवर्तनाचे वेळापत्रक व मागणी अर्जाबाबत सहकार्य करण्याचे शेतकऱ्यांनी ठरविले, तर पाण्याचे मागणी अर्ज न भरणाऱ्यांचे सोडलेल्या पाण्याबरोबरच मोजणी करणार असल्याचे अभियंता नलवडे यांनी या बैठकीत सांगितले, तर आठवडाभरात लिंगनूर शाखा कालव्यातून पाणी सोडून पुढे नंतर जानराववाडी, संतोषवाडी, खटाव येथील कालव्यांतून पाणी सोडण्यात येणार आहे.
या बैठकीस लिंगनूरचे कॉँग्रेस नेते आर. आर. पाटील, पोलीसपाटील मल्लय्या स्वामी, देवगोंडा पाटील, माजी सभापती मारुती नलवडे, आरगचे सर्जेराव खटावे, मन्सूरवाडीचे सुभाष खोत, संतोषवाडीचे हणमंत गायकवाड, बाळू गायकवाड यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
तीन कालव्यांतून प्रथमच पाणी
लिंगनूर शाखा कालव्यावरील कोळी गेट, मगदूमवाडी रस्त्याला छेदणारा उपकालवा, खटाव येथील बेडगे यांच्या वस्तीवरून पुढे जाणारा कालवा यातून प्रथमच पाणी सोडण्यात येणार आहे. या तीन कालव्यांची कामे उशिराने पूर्ण झाल्याने आजपर्यंत यातून पाणी वाहिले नव्हते. पण या आवर्तनात या कलव्यांचा समावेश झाल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
लिंगनूर मुख्य तलावात पाणी सोडण्याबाबतही चर्चा
शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी ‘लिंगनूर तलावाने गाठला तळ’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करून तलावाची घटलेली पाणीपातळी व उन्हाच्या दाहकतेचे चित्र स्पष्ट केले होते. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. मुख्य तलावात पाणी सोडण्याकरिता दशलक्ष घनफुटाकरिता सुमारे १७ हजार रुपये पाणीपट्टी आकारून पाणी सोडण्याबाबत लिंगनूर तलावावर काम करणाऱ्या काडदेव पाणी वापर संस्थेशी चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने नसेना का, परंतु काही प्रमाणात म्हैसाळच्या पाण्याने हा मुख्य तलाव भरून घेण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.