म्हैसाळला गॅस्ट्रोमुळे आरोग्य यंत्रणा जागी
By Admin | Updated: December 2, 2014 00:19 IST2014-12-01T23:20:14+5:302014-12-02T00:19:50+5:30
अधिकाऱ्यांची भेट : जनजागृती सुरू

म्हैसाळला गॅस्ट्रोमुळे आरोग्य यंत्रणा जागी
म्हैसाळ : कृष्णा नदीचे पाणी दूषित झाल्याने परिसरात गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. गावातील अनेक रुग्ण सांगली व मिरजेतील खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. गॅस्ट्रोची वाढती साथ लक्षात घेऊन जि. प. अध्यक्ष व अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिल्याने, ढेपाळलेली आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
वरिष्ठ पातळीवरुन गॅस्ट्रोची साथ थोपविण्यासाठी वड्डी, ढवळी, म्हैसाळ येथील ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य जागृतीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. म्हैसाळ गावास नदीचा पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामपंचायतीने चार दिवस पाणी पुरवठा बंद केला होता. गावात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम वाढविली होती. ठिकठिकाणी औषध फवारणी करण्यात आली होती. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावात आरोग्य सर्व्हे सुरू आहे. घरोघरी औषधांचे वाटप होत आहे.
आरोग्य केंद्रासंदर्भात ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. डॉक्टर व अन्य कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. औषधे देणे व माहिती सांगण्यास कर्मचारी टाळाटाळ करतात. परिसरातील उपकेंद्रे वेळेवर उघडी नसतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ग्रामस्थांचा विश्वास उडत आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन वरिष्ठांनी कारवाईचे संकेत दिल्याने परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)
कारवाईचे संकेत
प्राथमिक आरोग्य केंद्रासंबंधात ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी होत असतात. पण त्याची दखल कोण घेत नव्हते. जि. प. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मात्र या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेत दिल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.