‘म्हैसाळ’ची वीज पुन्हा तोडली
By Admin | Updated: June 8, 2015 00:50 IST2015-06-07T23:35:17+5:302015-06-08T00:50:09+5:30
वीज थकबाकी ९ कोटींवर : थकित पाणीपट्टी २0 कोटींच्या घरात

‘म्हैसाळ’ची वीज पुन्हा तोडली
प्रवीण जगताप -लिंगनूर -म्हैसाळ योजना मागील पाच वर्षांपासून थकबाकीच्या ओझ्याने दबली - पिचली जात आहे. त्यामुळे थकित पाणीपट्टीमुळे योजनेचे वीजबिलही भरता येत नसल्याने तेही थकित राहत असून त्याचा आकडा वाढतच आहे. यंदाच्या एप्रिल, मे या दोन महिन्यांतील वीजबिल सुमारे दिवसाला आठ लाख रूपये याप्रमाणे वाढून आता एकूण थकित वीजबिलाचा आकडा ९.३२ कोटीवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने श्निवारी रात्री आठ वाजता पुन्हा थकित वीजबिलामुळे वीज तोडली आहे.
ज्या म्हैसाळ योजनेमुळे लाभक्षेत्रातील २३ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळ्यात व रब्बी आवर्तनावेळी शिवार गार होते. पण या शिवार गार करणाऱ्या योजनेच्या पाण्याची पट्टीच थकित राहून त्याचा एकूण आकडा १९.५ कोटीवर पोहोचल्याने, ही योजनाच गार होण्याची भीती निर्माण झाली आहे. याला सर्वांनी मिळून उत्तर शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात उशिरा का होईना, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाले. क्रमश: मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव लाभक्षेत्राला कमी-अधिक प्रमाणात लाभ झाला आहे. लाभक्षेत्र जास्त असल्याने मिरज तालुक्याला अधिक लाभ झाला आहे. आता जून महिना सुरू झाला असून मान्सून केरळात दाखल झाला आहे. येत्या आठवड्यात तो सांगलीत दाखल होण्याची आशा आहे. शेतकऱ्यांच्या नशिबाने मान्सूनच्या आगमनापर्यंत ‘म्हैसाळ’चे आवर्तन आणि मान्सूनपूर्व पावसाने वेळ मारून नेली आहे. परंतु येणाऱ्या हिवाळ्यातील रब्बी आवर्तनासाठी पुन्हा पावसाळा संपल्यानंतर ज्यावेळी पाण्याची गरज निर्माण होईल, तेव्हा पुन्हा थकबाकी व पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न गंभीर होणार आहे.
थकबाकीशी संबंधित आकडेवारी लक्षात घेता, भविष्यात पुन्हा आवर्तनातील अडचणी वाढू द्यायच्या नसतील आणि पर्यायाने योजनेचे भविष्य उज्ज्वल बनविण्याकरिता थकबाकी भरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
लोकप्रतिनिधींचा रेटा गरजेचाच
यंदाच्या उन्हाळ्याची झळ अगदी फेब्रुवारीपासून सुरू झाली. सुरूवातीला लोकांची मागणी होऊनही लोकप्रतिनिधी सत्ताधारी व विरोधक कोणीच पुढे होत नव्हते. अशात भाजप सरकारच्या कालावधित पाणी केव्हा मिळणार, याकडेही अनेकांचे लक्ष होते. परंतु प्रश्नाचे गांभीर्य ध्यानात घेऊन थकबाकी भरण्याच्या प्रबोधनासह सर्वपक्षीय हाक देऊन खासदार संजयकाका पाटील पुढे आले. अगदी सर्वपक्षीय बैठका घेऊन पाणी सोडण्याबाबत व थकित पाणीपट्टीबाबत शासनस्तरावर आग्रही भूमिका मांडल्याने यंदाचे आवर्तन सुकर झाले. विरोधक व अन्यपक्षीयांनीही प्रश्नाचे गांभीर्य ध्यानात घेऊन याचे राजकारण न करता त्यास सर्वपक्षीय पाठिंबाच दिला.
शेतकऱ्यांना महत्प्रयासातून सुरू झालेल्या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाचा लाभ यंदा दोन महिने मिळाला असून, अगदी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याचा लाभ मिळाला. आता पुन्हा थकित वीजबिलाचा आकडा ९.३२ कोटीवर पोहोचल्याने महावितरण कंपनीने रात्री वीज तोडली आहे. त्यामुळे आता येणारा पावसाळा संपल्यानंतर पुन्हा रब्बी आवर्तन थकबाकीच्या मुख्य समस्येमुळे अडचणीत येणार आहे. यंदाचे उन्हाळी आवर्तन त्यामुळेच उशिरा सुरू झाले. येणारा रब्बी हंगाम सुखकर व्हावयाचा असल्यास आतापासूनच शेतकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी त्याचेच नियोजन करून थकबाकी भरण्यात पुढाकार घेतला पाहिजे.
- सूर्यकांत नलवडे,
सहायक कार्यकारी अभियंता
पाणीपट्टी वसुली केवळ २५ लाख
योजनेची पाणीपट्टी वसूल व्हावी, यासाठी पाटबंधारे विभागामार्फत हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात आले. पाणीपट्टीची वसुली होत नसल्याने वीजबिल थकले. परिणामी योजनाच बंद. अशा स्थितीत शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी मागणी अर्ज मिळाल्याशिवाय पाणी न सोडण्याचीही कठोर भूमिका घेण्यात आली. एवढे सारे करूनही पाणीपट्टी केवळ २५ लाख रूपये वसूल झाली आहे. आताही महावितरणची थकबाकी साडेनऊ कोटीपर्यंत पोहोचली आहे. अशीच स्थिती राहणार असेल, तर योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.