डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील तलावात टंचाईतून सोडण्यात आलेल्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याची लूट सुरूच आहे. सोमवारी रात्री अंकले ते डफळापूरदरम्यान बाज हद्दीत अज्ञातांनी पुन्हा कालवा फोडला. या पार्श्वभूमीवर म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी पोलीस बंदोबस्त मागविला असून, पाणी चोरी रोखण्यासाठी शेतकºयांची गस्त सुरूच आहे. दरम्यान, पैसे भरलेल्या शेतकºयांना तातडीने पाणी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा डफळापूर येथील कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदनव्दारे दिला आहे.गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या आदेशाने टंचाईतून गुरुवारपासून म्हैसाळ योजनेच्या बिळूर कालव्यातून डफळापूर तलावात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. पहिल्याचदिवशी डफळापूर हद्दीत कालवा फोडण्याचा प्रयत्न झाला. यानंतर शनिवारी रात्री अज्ञातांनी बाज परिसरात कालवा फोडला. यावेळी गस्तीवर असलेल्या डफळापूर येथील शेतकºयांनी तात्काळ जेसीबी यंत्र मागवून कालव्याचे भगदाड भरून घेतले. या पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार विलासराव जगताप यांनी डफळापूर येथे ग्रामस्थांची बैठक घेऊन अधिकाºयांना जाब विचारला. पाणी चोरी होऊ नये, यासाठी अधिकाराचा पूर्ण वापर करा, अशी सूचना केली. यानंतर सोमवारी रात्री पुन्हा अज्ञातांनी बाज परिसरात कालवा फोडला. रात्रीपासून कालव्यातील पाणी ओढ्यातून भोकरचौडी तलावाकडे जात आहे.या प्रकारानंतर कालवा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गस्तीवरील शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कालवा फोडल्याची माहिती म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांना देण्यात आली असून, याप्रकरणी प्रशासनाने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालविली आहे.
‘म्हैसाळ’चा कालवा बाजजवळ पुन्हा फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 15:32 IST