संस्थान गणपतीला निरोप
By Admin | Updated: September 2, 2014 23:58 IST2014-09-02T23:58:11+5:302014-09-02T23:58:11+5:30
सांगलीत शाही मिरवणूक : ग्रामीण भागातील भाविकांची गर्दी

संस्थान गणपतीला निरोप
सांगली : येथील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशाला आज (मंगळवार) पाचव्यादिवशी शाही विसर्जन मिरवणुकीद्वारे भावपूर्ण निरोप देण्यात आला. राजवाड्यातील दरबार हॉलपासून सरकारी घाटापर्यंत रथातून श्रींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली आणि सायंकाळी विसर्जन झाले. विजयसिंहराजे पटवर्धन व राजलक्ष्मीराजे यांच्याहस्ते दुपारी तीन वाजता श्रींची आरती करण्यात आली. धनंजय वाटवे व योगेश वाटवे यांनी विधिवत पूजा केली. त्यानंतर दरबार हॉलमध्ये पानसुपारीचा कार्यक्रम झाला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, माजी आमदार नितीन शिंदे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, नगरसेवक बाळासाहेब काकडे, व्यवस्थापक बी. के. जाजू आदी उपस्थित होते. पानसुपारीनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीमध्ये महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, बजरंग पाटील, समित कदम, माजी नगरसेविका स्वाती शिंदे, पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड सहभागी झाले होते. मिरवणुकीत घोडेस्वार, भालदार, चोपदार, अजमेरचा ढोल, नादप्रतिष्ठा ढोल-ताशा, ध्वजपथक, सांगलीवाडी येथील दत्तात्रय हरी चव्हाण कन्या विद्यालयाचे लेझीम पथक, हरिपूरचे हलगी पथक, सनई-चौघडा, गंधर्व बँड, तासगावच्या स्वामी रामानंद भारती विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे आरएसपी पथक सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. सुरुवातीला मिरवणूक काही काळ राजवाडा चौकात थांबविण्यात आली. त्यानंतर पटेल चौक, गणपती पेठ मार्गे गणपती मंदिर येथे आल्यानंतर श्रींची आरती झाली. मिरवणुकीच्या दुतर्फा सांगलीकरांसह ग्रामीण भागातून व कर्नाटकातूनही मोठ्याप्रमाणात आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. उत्सवमूर्तीवर भाविकांकडून पेढे, फुले व प्रसादाची उधळण करण्यात येत होती. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी मिरवणूक सरकारी घाटावर आली. तेथे ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’ अशा जयघोषात श्रींची मूर्ती होडीतून कृष्णा नदीच्या पात्रात मध्यावर नेऊन विधिवत विसर्जन करण्यात आले. (प्रतिनिधी)