पारा १६ अंशापर्यंत घसरला

By Admin | Updated: November 28, 2014 23:48 IST2014-11-28T22:41:18+5:302014-11-28T23:48:43+5:30

आला थंडीचा महिना : सांगली बाजारपेठेत गरम कपडे महागले

Mercury dropped to 16 degrees | पारा १६ अंशापर्यंत घसरला

पारा १६ अंशापर्यंत घसरला

सांगली : दिवाळीपासून सुरु होणारी थंडी गायबच होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून आता थंडीची लाट आली आहे. गेल्या चार दिवसात किमान तापमानात चार अंश सेल्सिअसने घसरण झाली आहे. थंडी वाढल्याने गरम कपड्यांना मागणी वाढल्याने त्यांच्या दरातही वाढ झाली आहे.
सांगली परिसरामध्ये २४ नोव्हेंबरपासून तापमानात घट होत गेली आहे. २४ नोव्हेंबररोजी कमाल तापमान ३०, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. आजचे (शुक्रवार) कमाल तापमान ३०, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. कालच्यापेक्षाही किमान तापमान दोन अंशाने घसरले आहे. गतवर्षी सर्वात कमी तापमान १२ अंशापर्यंत खाली घसरले होते. २००४ मध्ये सांगलीचे किमान तापमान ८ अंशापर्यंत खाली घसरले होते.
थंडीची लाट आल्यामुळे सकाळी धुक्याचा सामना करावा लागत आहे. सकाळी शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कानटोपी, पायमोजे, स्वेटर घालून जावे लागत आहे. विशेषत: रात्री अकरानंतर थंडी जाणवत आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत थंडीची हुडहुडी कायम राहात आहे. सायंकाळी सहानंतर पुन्हा थंडीची लाट येत आहे. थंडीची लाट आल्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत.
थंडीची लाट आल्यामुळे गरम कपड्यांना मागणी वाढली आहे. गरम कपड्यांच्या किमतीही दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढल्या आहेत. स्वेटर अडीचशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत आहेत. कानटोपी तीस रुपयांपासून ५० रुपये, तर हातमोजे ३० ते ४० रुपयांपर्यंत आहेत. महिलांचे स्वेटर अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत आहेत. लहान मुलांचे स्वेटर दोनशे रुपयांपर्यंत आहेत. जर्किनच्या किमती पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत आहेत. चार दिवसांपासून आमराई रस्त्यावरील स्वेटर विक्रेत्यांकडे गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)

दहा दिवसांतील कमाल-किमान तापमान


१९ नोव्हेंबर : ३१ - २९
२० नोव्हेंबर : ३१ - २८
२१ नोव्हेंबर : २९ - १८
२२ नोव्हेंबर : ३० - १७
२३ नोव्हेंबर : ३० - १७


२४ नोव्हेंबर : ३० - २२
२५ नोव्हेंबर : २९ - १७
२६ नोव्हेंबर : ३० - १८
२७ नोव्हेंबर : ३० - १८
२८ नोव्हेंबर : २९ - १६

Web Title: Mercury dropped to 16 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.