कुंडलापुरला शहाजी शिंदे यांच्या स्मारकाची होणार डागडुगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:27 IST2021-05-08T04:27:03+5:302021-05-08T04:27:03+5:30
जालिंदर शिंदे लाेकमत न्यूज नेटवर्क घाटनांद्रे : कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील ऐतिहासिक सरदार शहाजी शिंदे यांच्या स्मारकाचा जीर्णाेद्धार हाेणार ...

कुंडलापुरला शहाजी शिंदे यांच्या स्मारकाची होणार डागडुगी
जालिंदर शिंदे
लाेकमत न्यूज नेटवर्क
घाटनांद्रे : कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील ऐतिहासिक सरदार शहाजी शिंदे यांच्या स्मारकाचा जीर्णाेद्धार हाेणार आहे. दिघंची-हेरवाड रस्त्याच्या बांधकाम ठेकेदाराने हे काम स्वखर्चाने करण्याचे आश्वासन दिले आहे. तसा प्रस्तावही मंजूर झाला आहे.
ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे वंशज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोळचे जवळचे नातलग शहाजीराजे शिंदे यांचे कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथे स्मारक आहे. सध्या या इमारतीची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण चिरा निखळल्या आहेत. स्मारकाचा काही भाग तर झुडपाच्या विळख्यामुळे निकामी झाला आहे. परिसरातील वाघोली, गर्जेवाडी, दालगाव (सध्याचे ढालगाव), तिसंगी, कुंदनग्राम (सध्याचे कुंडलापूर), इरली (सध्याची इरळी) या गावांची जहागिरी शहाजी शिंदे यांच्याकडे होती.
नागज घाटात अफजलखानाशी झालेल्या युद्धात शहाजी शिंदे यांना वीरमरण आले. सावित्रीबाई व सईबाई या त्यांच्या पत्नींनी शर्थीने त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला व कुंडलापूर येथे अंत्यसंस्कार केले. दोघीही सती गेल्या. शिंदे यांच्या सैनिकांनी याठिकाणी स्मारक उभे केले. कालांतराने आदिलशाही सैन्याने त्याची प्रचंड नासधूस केली; परंतु याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही.
शिंदे यांच्या पराक्रमाची महती सांगणारे हे स्मारक दुर्लक्षित होते. येथे मोडी लिपीतील काही अक्षरे, चौथारे, गावकूस (तट), सतीचा हात, सतीची शिळा, गावाच्या वेशीचे अवशेष अशा ऐतिहासिक पाऊलखुणा पाहावयास मिळतात.
या स्मारकाच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा केला हाेता. कुंडलापूर सोसायटीचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी रस्ता बांधकाम ठेकेदाराकडे याबाबत प्रस्ताव देऊन पाठपुरावा केला. हा प्रस्ताव मान्य केल्याचे कंत्राटदार कंपनीच्या वतीने सुरेश बाबू यांनी सांगितले.
काेट
कुंडलापूर गावची अस्मिता असणारे पराक्रमी सरदार शहाजी शिंदे यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली हाेती. डागडुगीसाठी बांधकाम प्रशासनाकडे पाठपुरावा केला व त्याला यश आले. याचा खूप मोठा आनंद होतो आहे.
- दीपक चव्हाण
अध्यक्ष, कुंडलापूर सोसायटी
काेट
ही वास्तू ज्वलंत पराक्रमाची साक्ष देणारी आहे. हे अभ्यासानंतर समाेर आल्याने तात्काळ वरिष्ठांशी चर्चा करून या स्मारकाच्या डागडुजीस मंजुरी मिळवली. लवकरच हे काम पूर्ण केले जाईल.
- सुरेश बाबू
बांधकाम व्यावसायिक
————————-