मेघराज बरसले, सर्पराज खवळले

By Admin | Updated: August 17, 2014 23:09 IST2014-08-17T23:05:50+5:302014-08-17T23:09:49+5:30

एकाचा मृत्यू : जिल्ह्यात सहा महिन्यात ४३० जणांना सर्पदंश

Meghraj Barasale, Sarpraj khawle | मेघराज बरसले, सर्पराज खवळले

मेघराज बरसले, सर्पराज खवळले

सचिन लाड - सांगली --मान्सूनचे आगमन झाल्यापासून वातावरणातील बदल व मुसळधार पावसामुळे सर्पराज खवळले आहेत. वारुळासह जमिनीत पावसाचे पाणी शिरल्याने साप आश्रयासाठी आजूबाजूचा आश्रय घेत आहेत. मानवी वस्तीत त्यांच्याकडून दंश होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात ४३० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. यामध्ये लिंगनूर (ता. मिरज) येथील एकाचा मृत्यूही झाला आहे.
लोकमत विशेष--
उन्हाळा आणि हिवाळ्यात पावसाळ्याच्या तुलनेत सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण कमी आहे. सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयात सर्पदंशाचे दररोज सहा ते सात रुग्ण दाखल होत आहेत. गेल्या आठ दिवसात हा आकडा वाढला आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णास उपचारार्थ तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते. डॉक्टर प्रथम त्या रुग्णास अतिदक्षता विभागात हलवितात. विषारी आणि बिनविषारी असे सर्प असतात. यापैकी कोणत्या सापाचा रुग्णास दंश झाला आहे, हे कोणालाच समजत नाही. काही वेळेला डॉक्टरांना उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी संबंधित रुग्ण चावलेल्या सापास पकडून डॉक्टरांकडे घेऊन येतात. त्यांना सर्प कोणत्या जातीचा आहे, हे समजत नाही. सर्पदंश झालेल्या रुग्णाला चार-पाच तास देखरेखीखाली ठेवली जाते. यादरम्यान प्रकृतीने उपचारास प्रतिसाद दिला, तर धोका टळल्याचे मानले जाते.
गेला महिनाभर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. गारवा आणि ओलाव्यामुळे सर्प वारुळातून बाहेर पडत आहेत. ते आश्रयासाठी मानवी वस्तीत जात आहेत. घरातील, घराबाहेरील अडगळीत मिळेल त्याठिकाणी ते आश्रय घेतात. अशावेळी कोणी जवळ आले किंवा चुकून त्याला स्पर्श झाला तर दंश होतो. अनेकदा कशाचा दंश झाला आहे, हे समजत नाही. अज्ञात विषारी दंशाच्या संशयानेच त्याच्यावर उपचार केले जातात. गेल्या दोन महिन्यात शासकीय, तसेच खासगी रुग्णालयात सर्पदंशाने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्या ४३० पर्यंत गेली आहे.

Web Title: Meghraj Barasale, Sarpraj khawle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.