युवक राष्ट्रवादीच्या बैठकीत तू-तू मै-मै
By Admin | Updated: June 15, 2016 00:03 IST2016-06-14T23:08:22+5:302016-06-15T00:03:12+5:30
सांगलीतील प्रकार : ताजुद्दीन तांबोळी-वैभव शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक; बैठकीला वादाचे ग्रहण

युवक राष्ट्रवादीच्या बैठकीत तू-तू मै-मै
सांगली : युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी आणि सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस वैभव शिंदे यांच्यात मंगळवारी कार्यालयातील बैठकीतच तू-तू, मै-मै झाली. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी भाषणातून एकमेकांना टोमणे मारल्याने वातावरण तापले.
सांगली जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सांगलीतील जिल्हा कार्यालयात मंगळवारी पार पडली. या बैठकीस युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शैलेश मोहिते-पाटील निरीक्षक म्हणून उपस्थित होते. बैठकीत प्रशिक्षण शिबिर, मेळावा आयोजनाबद्दल नियोजन करण्यात येणार होते. युवक राष्ट्रवादीची बैठक असली तरी जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस वैभव शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. शिंदे यांनी भाषणात युवक राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, युवक राष्ट्रवादीत काम करणाऱ्या लोकांनी आता वयाचे भान ठेवले पाहिजे. आम्हाला पुन्हा संधी मिळत असतानाही वाढत्या वयाचा विचार करून आम्ही वरिष्ठ कार्यकारिणीत (फादर बॉडी) काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आम्हाला आता वरिष्ठ कार्यकारिणीत सरचिटणीस पद मिळाले आहे. युवक राष्ट्रवादीतील अन्य पदाधिकाऱ्यांनीही आता याचा विचार करायला हवा.
शिंदे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना ताजुद्दीन तांबोळी म्हणाले की, आम्ही कोणाचाही वारसा सांगून राजकारणात आलो नाही. स्वत:च्या कर्तृत्वावर या पदापर्यंत आम्ही मजल मारली आहे. कोणाकडेही कोणत्याही प्रकारचे पद मागितले नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच मला पद दिलेले आहे. आजची बैठक युवकची असतानाही मी स्वत: वैभव शिंदे यांना सन्मानाने विशेष निमंत्रण दिले होते. आम्ही तुमचा मान राखला असताना तुम्हीसुद्धा आमचा मान राखावा, अशी अपेक्षा आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या या शाब्दिक चकमकीने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली.
शैलेश मोहिते-पाटील यावेळी म्हणाले की, अजूनही आपले कार्यकर्ते सत्तेच्या मानसिकतेतून बाहेर पडलेले नाहीत. केवळ शासनावर टीका करून गप्प बसू नये. सांगली जिल्ह्यात मटका, दारुअड्डे सुरू असतील तर ते उद्ध्वस्त करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे. कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणे अपेक्षित आहे. विरोधक म्हणून कसे काम केले पाहिजे, याचे प्रशिक्षण शिबिरातून देण्यात येणार आहे. त्यामुळे हे शिबिर युवक कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे आहे. भाजप सरकार लोकांचा कसा विश्वासघात करीत आहे, याची कल्पना नागरिकांना दिली पाहिजे. गावा-गावातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, शहराध्यक्ष राहुल पवार, सचिव मदन देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
...अन्यथा पदावरून पायउतार व्हा
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जो इशारा आम्हाला दिला आहे, तोच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनाही लागू होतो. गावनिहाय राष्ट्रवादीच्या शाखा काढून पक्षाचा विस्तार करायला हवा.
ज्यांना शाखा काढणे जमत नाही, त्यांनी पदावरून पायउतार व्हावे, असा इशारा शैलेश मोहिते-पाटील यांनी दिला.