स्थायी समितीची निरोपाची सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:34+5:302021-09-02T04:56:34+5:30
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीसह आठ सदस्यांची शेवटची सभा मंगळवारी खेळीमेळीत झाली. अजेंड्यावरील तीनही विषयांना मंजुरी देण्यात आली. ...

स्थायी समितीची निरोपाची सभा खेळीमेळीत
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीसह आठ सदस्यांची शेवटची सभा मंगळवारी खेळीमेळीत झाली. अजेंड्यावरील तीनही विषयांना मंजुरी देण्यात आली.
सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. कोरे यांच्या सभापतिपदाचा कार्यकालही संपुष्टात आला. तसेच भाजपचे चार, काँग्रेस दोन व राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांची मुदतही संपली. सभेत फारसे महत्त्वाचे विषय चर्चेला नव्हते. शेवटची सभा असल्याने सदस्यांनी गोडीगुलाबींने सभेची सांगता केली.
या सभेत प्रभाग समिती दोनमधील ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्त करणे व नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी एक कोटीची निविदा प्रक्रिया झाली होती. ठेकेदार उमेश माने यांनी १६.९९ टक्के कमी दराने निविदा भरली होती. या निविदेला मान्यता देण्याचा विषय सभेत आला आहे. छपाई, बायंडिंग, वार्षिक पुरवठा करण्यासाठी २४ लाख रुपयांना आयुक्तांनी मान्यता दिली होती. हा अवलोकनीय विषय सभेला आला आहे. मंगळवार बाजार येथील खोकी पुनर्वसन गाळा क्रमांक एक वारसाहक्काने मीनाक्षी काळे यांना देण्याचा विषयही सभेत आहे.
कोरे म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी सभापतिपदाची संधी दिली. वर्षभराच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचे संकट असतानाही शहरातील विकासकामे थांबणार नाहीत, याची काळजी घेतली. वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प तयार केला. अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यासाठी प्रशासनासह भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांचेही सहकार्य मिळाले.