‘टेंभू’साठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
By Admin | Updated: December 1, 2015 00:10 IST2015-11-30T23:03:28+5:302015-12-01T00:10:27+5:30
सुमनताई पाटील : ढालगावमध्ये अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक

‘टेंभू’साठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
ढालगाव : दुष्काळी भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, तसेच टेंभू योजनेला लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून निधीची तरतूद करण्यास भाग पाडू, असे आश्वासन आमदार सुमनताई पाटील यांनी दिले.
ढालगाव (ता, कवठेमहांकाळ) भागातील अडीअडचणी सोडविण्यासाठी व दुष्काळी पाहणी दौरा आमदार पाटील यांनी केला. यावेळी ढालगाव येथे बोलताना त्या म्हणाल्या की, या भागातील जनतेचा महत्त्वाचा पाणीप्रश्न आहे. या भागास टेंभू योजनेतून पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री यांना भेटून ही योजना पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी तात्काळ मिळावा, अशी मागणी करणार आहे.
विविध खात्यांचे पदाधिकारी यांचा ताफा त्यांच्याबरोबर असल्याने काही प्रश्न त्यांनी जागेवरच सोडविले. ढालगाव येथे जिल्हा बॅँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के म्हणाले की, या भागातील प्रश्न सोडवायचे असतील तर प्रथम शरद पवार, अजित पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेटून टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. ढालगाव येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे.
यावेळी आर. आर. आबा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाटील यांनी, चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, शेतीपंपाचे वीज बिल माफ व्हावे, कृषी विमा मिळावा, शेतकऱ्यांना शेततळी मिळावीत, अशा विविध मागण्या केल्या.
आ. पाटील यांनी शेळकेवाडी, आरेवाडी, चोरोची, दुधेभावी, ढोलेवाडी, चुडेखिंडी, जांभुळवाडी, निमज, कदमवाडी असा दौरा केला.
बांधकाम व आरोग्य सभापती गजानन कोठावळे, उपसभापती जगन्नाथ कोळेकर, माजी सभापती सुरेखाताई कोळेकर, राधाबाई हाक्के, कल्पना घागरे, स्वामी बापू, खुटाळे, तम्मन्ना घागरे, महादेव वाघमारे, नीलम घागरे, उज्ज्वला साबळे, विशाल खोळपे उपस्थित होते. (वार्ताहर)
दुष्काळ तीव्र : उपाययोजनांची गरज
तालुक्यात खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. नोव्हेंबरमध्येच तीव्र पाणी टंचाई आहे. पुढील पाऊस येईपर्यंत सध्या उपलब्ध पाणी पुरवून वापरावे लागणार आहे. ताकारी, टेंभू, म्हैसाळ पाणी योजना सुरू करून तालुक्यातील तलाव वेळोवेळी भरून घेण्याची गरज आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर करून टंचाईतून उपाययोजना राबविण्याची गरज आहे. याबाबतही चर्चा करणार असल्याचे आमदार सुमनताई पाटील यांनी यावेळी सांगितले.
महावितरणच्याकारभाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी
गेल्या तीन दिवसांपासून आमदार सुमनताई पाटील यांचा तालुक्यात विभागवार दौरा सुरू आहे. दौऱ्यात विविध शासकीय कार्यालयांबाबतच्या तक्रारी त्या ग्रामस्थांकडून समजून घेत आहेत. यामध्ये सर्वात जास्त तक्रारी ‘महावितरण’च्या कारभाराबाबत असल्याचे दिसून आले.