वैद्यकीय विद्यार्थिनीची सांगलीत आत्महत्या
By Admin | Updated: November 29, 2015 00:59 IST2015-11-29T00:57:26+5:302015-11-29T00:59:29+5:30
विश्रामबाग पोलिसांत घटनेची नोंद

वैद्यकीय विद्यार्थिनीची सांगलीत आत्महत्या
सांगली : येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केली. तेजस्विनी शेखर कोरे (वय १९, रा. राममंदिर कॉर्नर, सांगली) असे तिचे नाव आहे. शनिवारी दुपारी चार वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची विश्रामबाग पोलिसांत नोंद आहे.
तेजस्विनी कोरे वैद्यकीय महाविद्यालयात दंत विभागात प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. दुपारी ती घरातील एका खोलीत अभ्यास करीत होती. दुपारी चार वाजता तिची आई तिच्याकडे गेली. त्यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता. आईने तिला हाक मारली. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश करण्यात आला. त्यावेळी तेजस्विनीने पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. तिला तातडीने उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत झाल्याचे घोषित केले.
दुपारच्या सुमारास तिने आत्महत्या केली आहे. त्यावेळी घरी तिची आई, आज्जी, भाऊ, बहीण होते. वडिलांचा कुपवाड एमआयडीसीत कारखाना आहे. आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट झाले नाही. पण पोलिसांनी नातेवाईकांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत अभ्यासाच्या ताण-तणावामुळे आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)