ड्रेनेज कामाच्या श्रेयावरून महापौर - नगरसेवकात जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:02+5:302021-05-22T04:25:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या प्रभागातील ड्रेनेज कामावरून श्रेयवाद उफाळून आला आहे. महापौरांनी आयुक्तांसह पाहणी ...

ड्रेनेज कामाच्या श्रेयावरून महापौर - नगरसेवकात जुंपली
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या प्रभागातील ड्रेनेज कामावरून श्रेयवाद उफाळून आला आहे. महापौरांनी आयुक्तांसह पाहणी करून या कामाचा आपणच पाठपुरावा केल्याचा दावा केला. त्याला भाजपचे नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी आक्षेप घेत, न केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नका, असा सल्ला तर दिलाच, शिवाय अडीच वर्षातील कामांची यादी महापौरांनी जाहीर करावी, असे आव्हान दिले.
महापौर सूर्यवंशी यांच्या प्रभागातील मंगलमूर्ती काॅलनीमधील ड्रेनेज योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी सूर्यवंशी यांनी आयुक्तांसह या कामाची पाहणी करत या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्याला भाजपचे नगरसेवक नवलाई यांनी आक्षेप घेतला आहे. नवलाई म्हणाले की, महापालिका आयुक्तांसह अन्य संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून या कामास सुरुवात केली आहे. एरवी मंगलमूर्ती कॉलनीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या महापौरांनी त्यांच्या प्रयत्नातून काम सुरू असल्याचा दावा करणे हास्यास्पद आहे. या प्रभागातून महापौर सूर्यवंशी हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. मग पंधरा वर्षात हे काम का पूर्ण केले नाही? महापौरांनी नागरिकांची दिशाभूल करू नये, अन्यथा त्यांना जशास तसे उतर देऊ. हिम्मत असेल तर गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांची यादी जाहीर करावी, असे खुले आव्हानही दिले.
कोट :
दिलेला शब्द पाळला
नवलाई म्हणाले, मंगलमूर्ती कॉलनी येथील ड्रेनेजच्या कामांबाबत नागरिक वारंवार विचारणा करत होते. त्याची दखल घेत सातत्याने या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करणारच असा शब्द नागरिकांना दिला होता. काम सुरू करून तो शब्द पाळला आहे.