महापौर, स्थायी सभापतींत वादाची ठिणगी
By Admin | Updated: May 20, 2016 23:45 IST2016-05-20T23:43:57+5:302016-05-20T23:45:14+5:30
महापालिका बजेट : समितीच्या सदस्यांचा निधी कापला; ड्रेनेज ठेकेदारावरून धारेवर

महापौर, स्थायी सभापतींत वादाची ठिणगी
सांगली : महापालिका स्थायी समिती सदस्यांना अंदाजपत्रकात दिलेल्या २५ लाख रुपयांच्या निधीला महापौर हारूण शिकलगार यांनी कात्री लावली आहे. या प्रकारामुळे स्थायी समितीचे सोळाही सदस्य नाराज झाले असून शुक्रवारी समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. अखेर सभापती संतोष पाटील यांनी इतर हेडमधील रक्कम तबदिल करून स्थायी समिती सदस्यांना पूर्वीप्रमाणेच ५० लाखाच्या निधीची तरतूद करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. निधी देण्यावरून महापौर व स्थायी सभापती यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सभापती संतोष पाटील यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्थायी समिती सदस्यांसाठी २५ लाख व इतर नगरसेवकांसाठी १५ लाख रुपयांची तरतूद केली होती. परिणामी स्थायी सदस्यांना ४० लाख रुपयांचा निधी मिळणार होता. स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकात महासभेच्या मान्यतेने महापौर हारूण शिकलगार यांनी काही बदल केले आहेत. महापौरांनी ६०३ कोटीचे अंदाजपत्रक ६८३ कोटीवर नेले आहे. ८० कोटीची वाढ करताना शिकलगार यांनी शामरावनगर परिसरासह काही गोष्टींवर विशेष मेहेरनजर दाखविली आहे. पण त्याचबरोबरच स्थायी समिती सदस्यांच्या निधीला कात्री लावून त्यांना दणकाही दिला आहे. सर्वच नगरसेवकांना एकसमान २५ लाखाच्या निधीची तरतूद केली आहे. या प्रकारामुळे स्थायी समितीचे सर्वपक्षीय सोळाही सदस्य नाराज झाले.
शुक्रवारी स्थायी समिती सभेत या विषयावर चर्चा झाली. याबाबत सभापती संतोष पाटील म्हणाले की, स्थायी समिती सदस्य म्हणून प्रभागात जादा निधी खर्च व्हावा, अशी नगरसेवकांची इच्छा असते. सध्या वित्त आयोग, शासकीय अनुदान, रस्ते अनुदानाचा निधी स्थायी समितीकडे येत नाही. त्यामुळे स्थायी समिती सदस्याला इतरप्रमाणेच निधी मिळणार आहे.
यापूर्वी स्थायीच्या सदस्यांना ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत निधी मिळत होता. यंदा मात्र महापौरांनी त्याला कात्री लावली. त्यामुळे आपण आपल्या अधिकाराचा वापर करीत आणखी २५ लाखाचा निधी स्थायी समिती सदस्यांना द्यावा, असा ठराव बांधकाम विभागाला पाठविला आहे. अंदाजपत्रकातील इतर हेडमधील रक्कम सदस्यांच्या निधीमध्ये वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात स्थायी समिती सदस्यांची ५० लाखाची कामे एकाचवेळी मंजूर करून ती आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविली जातील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सदस्यांचा संताप : अर्धा तास स्थायी अडली
विद्युत साहित्य खरेदीवरून सभेत वादळी चर्चा झाली. नगरसेवक प्रदीप पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्थायी समितीने तीन महिन्यापूर्वी ८० लाख रुपयांचे विद्युत साहित्य खरेदीचा ठराव करून दिला आहे. अद्यापही ही फाईल सह्यांमध्ये अडकली आहे. हे साहित्य खरेदी करण्यापूर्वीच आणखी साहित्य खरेदीचा विषय मंजुरीसाठी अजेंड्यावर घेण्यात आला कसा? असा सवाल केला. दरम्यान, साहित्य खरेदीची फाईलच गहाळ झाल्याचेही सभेत निदर्शनास आले. यावरून स्थायीचे कामकाज अर्धा ते एक तास रोखण्यात आले. फायलीवर सह्या झाल्याशिवाय सभा पुढे सुरू ठेवली जाणार नाही, असा इशारा सदस्यांनी दिला. अखेर ही फाईल शोधून आणण्यात आली. त्यावर इतर अधिकाऱ्यांच्या सह्या होऊन अंतिम मान्यतेसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आली. त्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले.