सभापतींच्या ‘बजेट’ला महापौरांची कात्री

By Admin | Updated: May 19, 2015 00:26 IST2015-05-18T23:13:56+5:302015-05-19T00:26:50+5:30

महापालिका : ९० कोटींच्या तरतुदी वगळल्या; पावणे सहाशे कोटींचे अंदाजपत्रक ४८४ कोटींवर आणले

The mayor of the 'budget' of the chairmanship | सभापतींच्या ‘बजेट’ला महापौरांची कात्री

सभापतींच्या ‘बजेट’ला महापौरांची कात्री

सांगली : नागरिकांवर करांचा कोणताही बोजा न टाकता, ‘दिल मांगे मोअर’चा जमाना असल्याचे सांगत स्थायी समिती सभापती संजय मेंढे यांनी दीड महिन्यापूर्वी सादर केलेल्या ५७३ कोटी ८९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला महापौर विवेक कांबळे यांनी कात्री लावली आहे. स्थायी समितीच्या तब्बल ९० कोटी रुपयांच्या तरतुदी अंदाजपत्रकातून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पालिकेचे अंदाजपत्रक ४८४ कोटीच्या घरात जाणार आहे. येत्या दोन दिवसात महासभेचे अंदाजपत्रक सदस्य व प्रशासनाच्या हाती दिले जाणार आहे. पालिका आयुक्त अजिज कारचे यांनी २६ फेब्रुवारी रोजी ५०२ कोटी १० लाख जमेचे व २६ लाख २२ हजार शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. या अंदाजपत्रकावर स्थायी सदस्यांच्या सूचना घेऊन सभापती मेंढे यांनी ३१ मार्च रोजी ५७३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महासभेकडे दिले. स्थायीने जमेच्या बाजूला ७४ कोटी ९२ लाखाची वाढ केली होती. यात घरपट्टीतून ६ कोटी, एलबीटीतून ६० कोटी, परवाना फी एक कोटी, दंडात्मक कार्यवाही एक कोटी, नवीन बांधकाम नियमावलीतील दंडात्मक शुल्क तीन कोटी, मीटरने पाणीपुरवठा आकार २.५० कोटी, कुटुंबकल्याण केंद्र २ कोटीचा प्रामुख्याने समावेश होता. या अंदाजपत्रकात सभापती मेंढे यांनी तब्बल १५९ कामांची बायनेम तरतूद केली आहे. या कामांवर ६९ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापौर, उपमहापौर व स्थायी सभापतींच्या विकास निधीतही त्यांनी भरघोस वाढ केली आहे. महापौर व स्थायी सभापतींना ७० लाख, तर उपमहापौरांना ३० लाखाचा अतिरिक्त निधी दिला होता. मिरजेत खंदकात भाजी मंडई, जिजामाता उद्यानाचा विकास, वारकरी भवन, नवीन उद्यानांचा विकास, तीन शहरात स्मशानभूमी, रिक्षा घंटागाडी, रस्ते, गटारी, खुल्या जागांचा विकास, समाजमंदिरांसाठी आर्थिक तरतूद केली होती. महासभेत सदस्यांच्या सूचनांसह अंदाजपत्रक मंजुरीचे अधिकार महापौर कांबळे यांना देण्यात आले होते. महापौरांनी दीड महिन्यात अंदाजपत्रकावर विविध सदस्यांच्या सूचना घेतल्या. त्यात महापौर व स्थायी सभापती यांच्यात वाद निर्माण झाल्याने यंदाचे अंदाजपत्रक लांबणीवर पडणार, असेच बोलले जात होते. पण येत्या दोन दिवसात महापौरांचे अंदाजपत्रक सदस्यांच्या हाती पडणार आहे. महापौरांनी स्थायीच्या अंदाजपत्रकाला कात्री लावत तब्बल ९० कोटी रुपयांच्या तरतुदी वगळल्या आहेत. या तरतुदींबाबत सध्या तरी गोपनीयता पाळली जात आहे. अंदाजपत्रक दोन दिवसात जाहीर झाल्यानंतरच त्याचा खुलासा होईल. (प्रतिनिधी)


महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक अंतिम करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात ते जाहीर केले जाईल. अंदाजपत्रक फुगीर न करता वास्तववादी करण्यावर आपला भर राहिला आहे. त्यामुळे काही तरतुदी वगळल्या आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती, उत्पन्न पाहता, ३७५ कोटीपर्यंत वास्तव अंदाजपत्रक होऊ शकते. पण विकासाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी काही तरतुदी केल्या आहेत.
- विवेक कांबळे, महापौर



महापौर-सभापती वादावर पडदा
आयुक्त अजिज कारचे यांनी सोमवारी महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, विरोधी पक्षनेते यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत महापौर विवेक कांबळे व संजय मेंढे यांच्यातील वादावर पडदा टाकण्यात आला. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी, आमच्यात कुठलेही हेवेदावे नसून प्रशासनाने उत्पन्न वाढीवर भर द्यावा, अशी सूचना प्रशासनाला केली. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. हरित न्यायालयाच्या निकालानुसार पैशाची तजवीज करावी लागणार आहे. भविष्यात पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी नवनवे स्रोत शोधावे लागतील. त्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत. त्याला पदाधिकारी म्हणून आम्ही पाठिंबा देऊ, अशी ग्वाहीही महापौरांनी दिली. पत्रकारांशी बोलतानाही महापौरांनी सभापतींशी वाद नसल्याचे सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Web Title: The mayor of the 'budget' of the chairmanship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.