विट्यातील मटका एजंट भूमिगत
By Admin | Updated: November 11, 2014 00:03 IST2014-11-10T22:14:08+5:302014-11-11T00:03:02+5:30
दुकाने बंद : वातावरण स्वच्छ होण्याची प्रतीक्षा--लोकमतचादणका

विट्यातील मटका एजंट भूमिगत
विटा : खानापूर तालुक्यासह विटा शहरात खुलेआम सुरू झालेला मटका ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणताच शहरातील मटका बुकींसह एजंटही भूमिगत झाले आहेत. नव्या जोमाने सुरू झालेल्या मटका व्यवसायाबद्दल गढूळ वातावरण झाल्याने काही दिवस मटका बंद ठेवण्याचे तोंडी फर्मान काढण्यात आले असल्याचे वृत्त आहे. परंतु, हे फर्मान कोणी काढले? हा विषय मात्र आजही गुलगुस्त्यातच आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन नव्या सरकारचा शपथविधी पार पडताच, गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला कल्याण-मुंबई मटका भर चौकात आला. या व्यवसायाला कायद्याच्या रक्षकांनीच प्रतिष्ठा मिळवून दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे. हा व्यवसाय नव्या दमाने सुरू झाल्याने मटका बुकी व एजंट यांच्यात फिलगुडचे वातावरण होते. विटा शहरासह खानापूर तालुक्यात मटका सुरू झाल्याची माहिती कानोकानी मिळताच, गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायातून निवृत्ती घेतलेल्या काही एजंटांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर अनेकांनी फिल्डिंग लावून, मुख्य मटका बुकींशीही हातमिळवणी केल्याचे समजते.
परंतु, कल्याण-मुंबई मटका एजंटांनी बस्तान बसविल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी प्रसिध्द करताच मटका बुकींसह एजंटांतही मोठी खळबळ उडाली. आज, सोमवारी अनेक मटका एजंटांनी आपली खोकी बंद ठेवून भूमिगत होणे पसंत केले. आज, सोमवारी विटा शहरातील आडवी पेठ, नेवरी नाका, खानापूर नाका, चौंडेश्वरी चौक, मायणी रस्ता या ठिकाणच्या प्रमुख पाच बुकींची खोकी बंद होती. याबाबत माहिती घेतली असता, विटा शहरासह तालुक्यात नव्याने सुरू झालेल्या मटका उद्योगाबाबत रविवारपासून वातावरण गढूळ झाल्याने वातावरण स्वच्छ होईपर्यंत काही दिवसांसाठी मटका बुकी व एजंटांनी मटका व्यवसाय बंद ठेवण्याचे तोंडी फर्मान काढले असल्याचे, नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर एका नागरिकाने सांगितले.
दरम्यान, गढूळ वातावरण स्वच्छ होईपर्यंत मटका उद्योग बंद ठेवण्याचे फर्मान कोणी काढले? याबाबत माहिती मिळू शकली नाही. (वार्ताहर)