गाळ्यांचे वर्षातून दोनदा मूल्यांकन
By Admin | Updated: September 24, 2015 23:56 IST2015-09-24T22:35:03+5:302015-09-24T23:56:57+5:30
जिल्हा परिषदेचा निर्णय : भाडे वसुलीकडे दुर्लक्ष

गाळ्यांचे वर्षातून दोनदा मूल्यांकन
सांगली : विटा, तासगाव, मिरज येथे जिल्हा परिषदेच्या मालकीचे गाळे असून त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच तेथील मालमत्ता व्यवस्थित राहत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. याची दखल घेऊन वर्षातून दोन वेळा जिल्हा परिषदेच्या मालकीचे गाळे व मालमत्तांचा अधिकाऱ्यांनी शोध घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच गाळेधारकांकडून भाडे वसुलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बांधकाम समिती सभापतींनी दिला.सभापती गजानन कोठावळे यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची बैठक झाली. यावेळी सुरेश मोहिते यांनी, जिल्हा परिषदेच्या मालमत्तांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, म्हणूनच विटा आणि तासगाव येथे अनधिकृत बांधकामे झाली आहेत. प्रत्येकवेळी कुणीही अनधिकृत बांधकामे करायची व पुन्हा त्यास मंजुरी द्यायची, हे चालणार नाही. यामध्ये प्रशासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी केली. त्यानुसार सभापती कोठावळे यांनी, गाळे आणि मालमत्तांचा शोध घेण्याची जबाबदारी उपअभियंत्यांवर टाकली आहे. मालमत्ता तपासून गाळेधारकांकडून भाडे वसुलीचा अहवाल अधिकारी सादर करतील, असे सांगितले.
कोठावळे म्हणाले की, विटा, तासगाव येथील गाळेधारकांकडे पाच लाख ९६ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी एक लाख ५५ हजार रूपये वसूल झाले आहेत. विटा येथील दोन संस्थांच्या बांधकामाची चौकशी करून अधिकाऱ्यांना अहवाल देण्याची सूचना दिली आहे. जिल्ह्यातील रस्त्यांवरील दिशादर्शक फलक खराब झाले आहेत. म्हणून दोन हजार फलक तयार करण्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
यावेळी सदस्य संजय सावंत, रणजित पाटील, छायाताई खरमाटे, कल्पना सावंत आदींसह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)