फोटो ओळ : कुपवाडमध्ये महापालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑनलाईन विक्रेत्यांचे संपूर्ण साहित्य जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : राज्यात संपूर्ण संचारबंदी असताना ऑनलाईन घरगुती पंखे, मोबाईल, कपडे असे विविध प्रकारचे साहित्य विक्री करणाऱ्या एका ऑनलाईन विक्रेत्यांचे संपूर्ण साहित्य महापालिकेकडून जप्त करण्यात आले. ही कारवाई महापालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही साहित्याची विक्री करण्यावर बंदी असताना शुक्रवारी दुपारी कुपवाड शहरात काही तरुण दुचाकीवरून घरगुती पंखे, मोबाईल, कपडे, भांडी आदी साहित्याची ऑनलाईन विक्री करण्यासाठी आले होते. ही माहिती काही विक्रेत्यांनी महापालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांना दिली.
सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी तातडीने धाव घेतली. यावेळी एक तरुण कुपवाड शहरात घरगुती पंखे, मोबाईल, कपडे, भांडी आदी साहित्याची विक्री करीत असताना आढळून आला. सहायक आयुक्तांनी सदर मालाचा पंचनामा करून माल जप्त केला आहे. याबाबत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरची कारवाई केली आहे. परंतु संबंधित ऑनलाईन विक्रेत्याला किती रुपयांचा दंड केला ही माहिती मिळू शकली नाही.