मारुती देसक यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:26 IST2021-04-01T04:26:57+5:302021-04-01T04:26:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : सय्यदवाडी-येळापूर (ता. शिराळा) येथील मारुती-यशवंत येळापूरकर या लोकनाट्य तमाशा फडाचे मालक मारुती बापू देसक ...

मारुती देसक यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : सय्यदवाडी-येळापूर (ता. शिराळा) येथील मारुती-यशवंत येळापूरकर या लोकनाट्य तमाशा फडाचे मालक मारुती बापू देसक (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
वयाच्या २०व्या वर्षी मारुती देसक आणि यशवंत चांदणे यांनी मारुती-यशवंत लोकनाट्य तमाशा मंडळ येळापूरकर या नावाने फडाची स्थापना केली. मध्यंतरी ३-४ वर्षे त्यांनी शिवराम बोरगावकर, रघुवीर खेडकर, गणपतराव व्ही. माने-चिंचणीकर, कांताबाई सातारकर यांच्या तमाशातही अनेक पात्रे रंगवली होती. त्यानंतर पुन्हा स्वतःचा फड सुरू ठेवत या जोडीने तब्बल ६० वर्षे मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण भागातील रसिकांची मने जिंकली. अलीकडे ६-७ वर्षांपासून शरीर साथ देत नसल्याने ते व्यवसाय बंद करून वारकरी संप्रदायात सक्रिय झाले होते. यात्रा आणि तंबूत त्यांची ऐतिहासिक वगनाट्ये गाजली होती. रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेल्या देसक यांच्याकडे 'राजा ' म्हणूनच लोक पाहात होते. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि मने जिंकणारा कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना राज्यस्तरापर्यंत विविध पुरस्कार मिळाले हाेते. उत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक, नायक, खलनायक म्हणून २००३ आणि २०१० साली विशेष पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले हाेते.