‘हुतात्मा’चा डिस्टिलरी प्रकल्प लवकरच
By Admin | Updated: September 26, 2015 00:15 IST2015-09-25T22:49:34+5:302015-09-26T00:15:56+5:30
वैभव नायकवडी : प्रतिदिन ३० हजार लिटर क्षमता; सर्व शेतकऱ्यांना हिशेब देणार

‘हुतात्मा’चा डिस्टिलरी प्रकल्प लवकरच
वाळवा : हुतात्मा साखर कारखान्यात येणाऱ्या आठ महिन्यात आसवनी (डिस्टिलरी) इथेनॉल प्रकल्पाची उभारणी पूर्ण केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ३० हजार लिटर प्रतिदिन उत्पादन क्षमता असणाऱ्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या उभारणी कामाचे करारपत्र संचालक मंडळ सभेत करण्यात आले. यावेळी नायकवडी म्हणाले की, सद्य:स्थितीत साखर उद्योग अतिरिक्त साखर उत्पादनामुळे व घसरलेल्या साखरेच्या दरामुळे अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये नुसत्या साखरेवर शेतकऱ्यांना भरीव ऊसदर देणे अवघड झाले आहे. त्यासाठी उपपदार्थ निर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच येत्या आठ महिन्यात ‘हुतात्मा’ ३० हजार लिटर प्रतिदिन उत्पादन क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प सुरू करीत आहे. या प्रकल्पामध्ये डिस्टिलरी प्रकल्प उभारणी, त्यातून रेक्टीफाईड स्पिरिट, एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल, फ्युएल इथेनॉल प्राप्त होणार आहे. याचे पुरवठादार मे. नरनलाल प्रा. लि., नवसारी आहेत. बायोगॅस प्लॅन्ट उभारणीमध्ये पुरवठादार इकोबोर्ड इंडस्ट्रिज पुणे, इव्हॉपोरेशन प्लॅन्ट उभारणी पुरवठादार मे. केबीके केम इंडस्ट्रिज प्रा. लि., पुणे, कम्पोस्टिंग सिस्टिम उभारणी पुरवठादार मे. ट्रायोकेम शु. को. टेक्. इंजिनिअरिंग प्रा. लि, पुणे आहेत. आठ महिन्यात हा प्रकल्प उभारला जाईल आणि प्रत्यक्षात उत्पादनाला प्रारंभही होईल असे त्यांनी सांगितले.यावेळी कार्यकारी संचालक एन. एल. कापडणीस, उपाध्यक्षा वंदना माने, सरपंच गौरव नायकवडी, संचालक, कारखान्याचे अधिकारी, पुरवठादार व उभारणी करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)
संजय कोले यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल
हुतात्मा कारखान्याचा पूर्वइतिहास तपासून आणि ठेवी कपातीवरील व्याज १५ टक्के परत केले आहे, याचा विचार करून संजय कोले यांनी बोलायला पाहिजे होते, असे मत विश्वास थोरात यांनी व्यक्त केले.
कोले यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल न करता त्यांना खरी वस्तुस्थिती सांगावी. कामगारांना ४0 टक्के बोनस दिला आहे. यामुळे ‘हुतात्मा’च्या शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा आर्थिक स्तर सुधारला.
संजय कोले तुम्ही स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी समजता, मग सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी पहिली उचल कमी दिली आहे. येथे तुम्ही मूग गिळून गप्प का आहात?, असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला.
‘हुतात्मा’चा कारभार शेतकऱ्यांच्या हिताचा असतानाही यापुढेही शेतकऱ्यांना ऊसदर जादा देणार आहे. या प्रगतीमुळेच संजय कोले तुम्हाला या सगळ्याची भोवळ आली आहे, असे विश्वास थोरात म्हणाले.