विवाहितेची आत्महत्या; पतीला चोप
By Admin | Updated: June 12, 2016 01:20 IST2016-06-12T01:20:29+5:302016-06-12T01:20:29+5:30
सांगलीतील घटना : नातेवाइकांनी केला छळाचा आरोप

विवाहितेची आत्महत्या; पतीला चोप
सांगली : शहरातील शिवोदयनगर येथील स्मिता रूद्रकुमार खानुरे (वय ३०) या विवाहितेने शनिवारी सकाळी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर विवाहितेच्या नातेवाइकांनी पती रूद्रकुमार याला शासकीय रुग्णालय परिसरात बेदम चोप दिला. यात तो जखमी झाला आहे. दरम्यान, रूद्रकुमार हा स्मिताचा छळ करीत होता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
शिवोदयनगर येथील रूद्रकुमार खानोरे व स्मिता यांचा विवाह २००८ मध्ये झाला होता. स्मिताचे माहेर मिरजेतील गुरुवार पेठेत आहे. त्यांना मुलगी राशी (वय ७) व मुलगा ऋषित (५) अशी दोन मुले आहेत. घरी दोघे पती-पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे. गेल्या काही वर्षांपासून पती-पत्नीत वारंवार भांडणे होत होती. रूद्रकुमार स्मिताचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. त्याला दारूचेही व्यसन होते. गेल्या दोन दिवसांपासून तो दारूच्याच नशेत होता. रूद्रकुमारची आई बाहेरगावी गेली होती. शनिवारी सकाळी स्मिता हिने स्वयंपाकघरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर रूद्रकुमारने तिला खाली उतरून मोटारीतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्या आई-वडिलांना दूरध्वनी करून तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले. तिचे आईवडील रुग्णालयात दाखल झाले. तोपर्यंत वैद्यकीय सूत्रांनी तिला मृत घोषित केले होते.
हे समजताच स्मिताच्या नातेवाईकांनी रूद्रकुमारला शासकीय रुग्णालयातच बेदम चोप दिला. त्याच्या डोक्यात सलाईनची बाटली अडकवण्याची सळीही घातली. डोक्यातून रक्तस्त्राव झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयाच्या परिसरातून बाहेर काढले व संजयनगर पोलिस ठाण्यात नेले. तोपर्यंत रुग्णालय परिसरात विवाहितेच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. स्मिताच्या आई मंगला पंडित कामिरे यांनी रूद्रकुमारनेच तिचा घातपात केल्याचा आरोप केला. तो सातत्याने तिचा छळ करीत होता. दोन दिवसापासून त्याने तिच्या अंगावर घागरीने पाणी ओतून मारहाण केली होती. दोन्ही मुलांनाही तो मारहाण करीत असे, असाही आरोप केला. सायंकाळी शवविच्छेदनानंतर स्मिताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलिस ठाण्यात चौकशीचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)