निर्बंधांना ठेंगा दाखवित बाजारपेठा खुल्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST2021-04-07T04:27:04+5:302021-04-07T04:27:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या नव्या निर्बंधांप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश दिले असले ...

निर्बंधांना ठेंगा दाखवित बाजारपेठा खुल्याच
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या नव्या निर्बंधांप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी, शासन निर्णयावर नाराज असलेल्या व्यापाऱ्यांनी निर्बंधांना न जुमानता मंगळवारी नेहमीप्रमाणे दुकाने उघडली. त्यामुळे बाजारपेठा, रस्त्यावरील भाजीपाला विक्री, हातगाडे यांची लगबग नेहमीप्रमाणेच सुरू राहिली.
सांगली जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून नव्या निर्बंधांची व लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पोलिसांचा रात्रीचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मंगळवारी सकाळपासून सर्व व्यापारी पेठा व एकल दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र या आदेशाला न जुमानता शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली. त्यामुळे निर्बंधांचा कोणताही परिणाम बाजारपेठांवर झाला नाही.
सांगलीतील स्टेशन रोड, गणेश मार्केट, वखारभाग, सिंधी मार्केट, गणपती पेठ, सराफ बाजार, कापड पेठ, मारुती रोड, हरभट रोड, मारुती चौक, शिवाजी मंडई परिसर, एस.टी. स्टँड परिसर, राजवाडा चौक, राम मंदिर चौक, विश्रामबाग, वारणाली रोड, कुपवाड रोड, शंभरफुटी आदी सर्व ठिकाणी व्यापारी दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. रस्त्यावरील हातगाडेसुद्धा नव्या नियमांनी जागचे हलले नाहीत.
शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता, मात्र पोलिसांनी दुकाने बंद करण्याबाबत कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. गणपती पेठेत दुपारी ११ वाजेपर्यंत काही दुकाने बंद होती, मात्र अन्य व्यापारी पेठा सुरू झाल्यानंतर त्यांनीही दुकाने सुरू केली. त्यामुळे शहरातील कानाकोपऱ्यातील दुकानेही सुरू झाली. सांगलीच्या मार्केट यार्डमधील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.
चौकट
हॉटेल्स बंद, पार्सल सुरू
शहरातील दारूची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. बार व हॉटेल्स बंद करून केवळ जेवणाची पार्सल सेवा सुरू करण्यात आली होती. अनेक हॉटेल्ससमोर त्याबाबतचे फलकही लागले होते.
चौकट
मंदिरांना पुन्हा लागले कुलूप
शहरातील गणपती मंदिर, दुर्गामाता मंदिर, मारुती मंदिर यांसह प्रमुख सर्व मंदिरांचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. मंदिर प्रशासनाने याबाबत निर्बंधांचे काटेकाेर पालन केले होते.
चौकट
व्यापारी संघटना आक्रमक
सांगलीतील व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, शासनाने लादलेले निर्बंध अन्यायी असल्याचे मत मांडले आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरून त्यांची भूमिका स्पष्ट केली. व्यापाऱ्यांनीही दुकाने सुरू ठेवून निर्बंध मान्य नसल्याचे स्पष्ट केले.