पोलीस ठाण्यासमोर नियमभंगाचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:57+5:302021-09-12T04:30:57+5:30

सांगली : शहर पोलीस ठाण्याला लागूनच भरणाऱ्या शनिवारच्या आठवडा बाजारात विक्रेते, नागरिकांनी कोराेनाच्या नियमांना ठेंगा दाखवत मोठी गर्दी केली. ...

Market in front of the police station | पोलीस ठाण्यासमोर नियमभंगाचा बाजार

पोलीस ठाण्यासमोर नियमभंगाचा बाजार

सांगली : शहर पोलीस ठाण्याला लागूनच भरणाऱ्या शनिवारच्या आठवडा बाजारात विक्रेते, नागरिकांनी कोराेनाच्या नियमांना ठेंगा दाखवत मोठी गर्दी केली. पोलिसांसमोर हा सर्व प्रकार सुरू असताना एकावरही कारवाई झाली नाही. नियमांच हरताळ फासत सुरू असलेला नागरिकांचा हा गाफीलपणा तिसऱ्या लाटेला निमंत्रण तर देणार नाही ना, अशी शंका आता व्यक्त होत आहे.

आठवडा बाजार सुरू झाले असले, तरी त्यांना नियमांचे बंधन घालण्यात आले आहे. सुरक्षित अंतर राखणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा सर्व गोष्टींचे पालन त्यांना करायचे आहे. शनिवारच्या आठवडा बाजारातील रस्त्यावरून सायकलही जाणार नाही, इतकी गर्दी झाली होती. विक्रेते एकमेकांना खेटून बसले होते. अनेक विक्रेते, खरेदीदार यांनी मास्कला हनुवटीवर ठेवले होते. भाजीपाल्याच्या बाजारात नियमांचा पालापाचोळा पोलिसांच्या साक्षीने करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे. जिल्ह्यातील दुसरी लाट ओसरत असताना लॉकडाऊनचे नियम शिथिल करीत प्रशासनाने अनेक व्यावसायांना मुभा दिली, मात्र या सवलतीचा गैरफायदा आता अनेकजण घेत असल्याचे दिसत आहे.

शनिवारच्या बाजारात गर्दीने कहर केला. कोरोना नावाचा आजार अस्तित्वातच नसल्याच्या अविर्भावात विक्रेते, खरेदीदार वावरत होते. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या आवारात दिवसभर पोलिसांची ये-जा सुरु होती, मात्र एकाही पोलिसाने कारवाईबाबत पाऊल उचलले नाही.

चौकट

वाहतुकीची कोंडी

बाजारातील गर्दीमुळे सांगलीच्या टिळक चौकापासून स्टेशन रोडपर्यंत वाहतुकीची कोंडी दिवसभर होती. शनिवारचा आठवडा बाजार मित्रमंडळ चौकापासून कापडपेठ, हरभट रोड, भारती विद्यापीठासमोरील रस्त्यापर्यंत पसरला आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणच्या वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.

Web Title: Market in front of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.