खासदारांच्या घरावर मोर्चा काढणार

By Admin | Updated: December 8, 2015 00:32 IST2015-12-07T23:43:59+5:302015-12-08T00:32:23+5:30

रघुनाथ पाटील : म्हैसाळ योजनेची थकबाकी सात-बारावर चढू देणार नाही

To march on MP's house | खासदारांच्या घरावर मोर्चा काढणार

खासदारांच्या घरावर मोर्चा काढणार

सांगली : दुष्काळी भागातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या म्हैसाळ योजनेची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून चालू आहे. अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी, त्यांच्यावर अन्याय होत असून, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सात-बारावर थकबाकी चढवू देणार नाही, असे सांगत, हा प्रकार त्वरित न थांबल्यास खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
पाटील पुढे म्हणाले, म्हैसाळ योजनेची थकबाकी पूर्णपणे शासनाने भरणे आवश्यक असताना, प्रशासनाने मात्र ही थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची कार्यवाही चालू केली आहे. थकबाकी वसुलीचा हा पर्याय अजब असून, यात शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जाणार आहेत. मुळात या योजनेची लादण्यात आलेली थकबाकी ही मनमानी पध्दतीने आकारण्यात आल्याने, शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही थकबाकी भरु नये. यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आल्यास शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. तरीही प्रशासनाने थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविल्यास, खासदारांच्या घरावर संघटनेच्यावतीने मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उसाच्या ‘एफआरपी’बाबत ते म्हणाले, कोणताही कायदा नसताना केवळ परिपत्रकाच्या आधारे एक टन उसाला ४ हजार कर सरकार घेते. परंतु, एफआरपीबाबत कायदा असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. एफआरपी कारखानदारांना बंधनकारक करावी. यासाठी निधीची तरतूद कशी करावयाची हा सरकारचा प्रश्न असून, एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या केंद्र शासनाकडून जाहीर झालेला सातवा वेतन आयोग देण्यात येऊ नये. कारण हा आयोग देऊन, ऐतखाऊंना पोसण्याचे काम शासन करणार आहे. वेतन आयोग लागू करण्यास संघटनेचा विरोध राहील. (प्रतिनिधी)

शर्यतीवरील बंदी उठवा : उद्या मिरजेत बैठक
गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्यात यावा, बैलगाडी, घोडागाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, यांसह सर्व मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने बुधवार, दि. ९ डिसेंबरला मिरज येथील किसान चौकात सभेचे आयोजन केले असून, या सभेस देशातील शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित राहणार असल्याचेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.

Web Title: To march on MP's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.