मराठा युवकांनी राजकारणात न पडता उद्योजक बनावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:45+5:302021-09-02T04:56:45+5:30
इस्लामपूर येथे नव उद्योजकांचा सत्कार माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. या वेळी उद्योजक सर्जेराव यादव, विशाल पाटील, ...

मराठा युवकांनी राजकारणात न पडता उद्योजक बनावे
इस्लामपूर येथे नव उद्योजकांचा सत्कार माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. या वेळी उद्योजक सर्जेराव यादव, विशाल पाटील, प्रविण पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : मराठा समाजाचा युवक उद्योजक बनला पाहिजे. यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावाचा लाभ मिळत आहे. मराठा समाजातील युवकांनी राजकारणात न पडता उद्योजक बनावे, असे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
येथील सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित मराठा उद्योजकांच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी नरेंद्र पाटील बोलत होते. उद्योजक सर्जेराव यादव, प्रवीण पाटील, विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नरेंद पाटील म्हणाले की, कोरोनाकाळात अन्य महामंडळे बंद असताना मराठा महामंडळाचे समन्वयक त्यांच्या जिवाची बाजी लावून उद्योजकांना सहकार्य करत होते. सांगली जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत १५०२ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी कर्ज दिले आहे. या लाभार्थ्यांना विविध राष्ट्रीय, सहकारी बँकेच्या मार्फत ११३ कोटी ८० लाखांपर्यंत कर्जवाटप केले. या लाभार्थ्यांना ८ कोटी ७५ लाखांपर्यंत व्याज परतावा थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण पात्रता लाभार्थी २९९२ इतके आहेत.
सर्जेराव यादव म्हणाले की, नरेंद्र पाटील हे वडलांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे आले आहेत. उद्योग करताना प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. कामगारांशी ऋणानुबंध ठेवा. मराठा उद्योजकांकडे बुद्धिमता आहे. त्यांनी त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करून यशस्वी उद्योजक व्हावे. मराठा युवकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. या वेळी महामंडळातून कर्ज घेऊन यशस्वी झालेल्या उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी उत्तम पाटील, महेश माने, नितीन जाधव, गणेश खोत, विशाल चव्हाण यांसह लाभार्थी व नव उद्योजक उपस्थित होते.