मानसिंगराव नाईक, दिलीपतात्या बिनविरोध
By Admin | Updated: April 25, 2015 00:12 IST2015-04-25T00:09:24+5:302015-04-25T00:12:17+5:30
जिल्हा बँक निवडणूक : १९ जागांसाठी ५३ जण रिंगणात; पलूस, कडेगाव, मिरज, जतमध्ये चुरस

मानसिंगराव नाईक, दिलीपतात्या बिनविरोध
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शुक्रवारी ३३१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिराळा सोसायटी गटातून माजी आमदार मानसिंगराव नाईक व वाळवा सोसायटी गटातून दिलीप तात्या पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित १९ जागांसाठी ५३ जण रिंगणात असून पलूस, कडेगाव व मिरज या तीन तालुक्यात मोठी चुरस आहे.
जिल्हा बँकेसाठी २२०७ मतदार असून ५ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ३८४ उमेदवारांनी ४८५ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३३१ जणांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. माजी मंत्री जयंत पाटील, भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री मदन पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक आदींनी सर्वपक्षीय आघाडीतील इच्छुक उमेदवारांची समजूत काढून त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली.
काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी इच्छुकांना विनंती केली. अर्ज मागे घेण्यासाठी दुपारनंतर गर्दी झाली होती. अनेक बड्या इच्छुकांंनी नाराजीचा सूर आळवत अर्ज मागे घेतले. रात्री उशिरापर्यंत अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. वाळवा सोसायटी गटातून दिलीप तात्या पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांच्या विरोधातील सर्व अर्ज मागे घेण्यात आले, तर शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक हेही बिनविरोध निवडून आले. त्यांच्या सोसायटी गटात एकमेव अर्ज होता.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व काँग्रेसमधील मदन पाटील गटाने सर्वपक्षीय आघाडी करीत शेतकरी सहकारी पॅनेल उभे केले आहे, तर काँग्रेसमधील मोहनराव कदम, विशाल पाटील, महेंद्र लाड, विक्रम सावंत या चार जणांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. (प्रतिनिधी)
चुरशीच्या लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष
जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय आघाडीचे प्रयत्न फसल्यानंतर निवडणुकीचे चित्र आणखीनच स्पष्ट झाले. पलूस, कडेगाव, जत व मिरज या चार तालुक्यात चुरशीच्या लढती होत आहेत. पलूस तालुक्यात पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड यांची उमेदवारी कायम राहिली आहे. त्यांची लढत शेतकरी सहकारी पॅनेलचे उमेदवार डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी होणार आहे. कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी अर्ज कायम ठेवला. या तालुक्यात कदम विरुद्ध धोंडीराम महिंद यांच्यात लढत होत आहेत. जत तालुक्यातून सर्वपक्षीय आघाडीकडून आमदार विलासराव जगताप यांचे चिरंजीव मनोज यांना उमेदवारी मिळाली आहे. या तालुक्यात काँग्रेसकडून विक्रम सावंत व सुरेश शिंदे यांनी आव्हान दिले आहे, तर मिरज तालुक्यातून मदन पाटील विरूद्ध विशाल पाटील अशी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.