मनप्रीतसिंगची ‘बाला’वर मात
By Admin | Updated: April 28, 2015 23:44 IST2015-04-28T23:28:25+5:302015-04-28T23:44:50+5:30
नेवरीत मैदान : हजारो कुस्ती शौकिनांची हजेरी

मनप्रीतसिंगची ‘बाला’वर मात
नेवरी : नेवरी (ता. कडेगाव) येथे सिद्धनाथ यात्रा कमिटीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात पंजाबकेसरी मनप्रीतसिंगने हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचा पठ्ठ्या बाला रफिकला अवघ्या साडेचार मिनिटांत उलटी डावावर अस्मान दाखवून दीड लाख रुपयाचे पहिले बक्षीस पटकावले. येथे सिद्धनाथ यात्रेनिमित्त छत्रपती शिवाजीराजे क्रीडांगणावर कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या. मनप्रीतसिंग व बाला रफिक यांच्यात पहिल्या क्रमाकांची लक्षवेधी लढत झाली. खासदार संजयकाका पाटील, डबल महाराष्ट्रकेसरी चंद्रहार पाटील, कडेगावचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. बाला रफिकने सुरुवातीलाच मनप्रीतसिंगवर ताबा घेतला होता; मात्र काही क्षणातच मनप्रीतसिंगने उलटी डावावर बाला रफिकला अस्मान दाखविले.
व्दितीय क्रमांसासाठी राजाराम यमगर विरुध्द वसंत खेचे यांच्यात एक लाख इनामाची कुस्ती झाली. यामध्ये यमगरने खेचेवर ताबा मिळवत कुस्ती जिंकली. तृतीय क्रमांकासाठी आप्पा बुटे विरुध्द रहीम खान यांच्या कुस्तीसाठी ७५ हजार रुपयांचे बक्षीस होते. आप्पा बुटेने रहीम खानचा अंदाज घेत त्याला अस्मान दाखविले. मैदानात लहान-मोठ्या एकूण १३० कुस्त्या पार पडल्या. वैयक्तिक व यात्रा कमिटीकडून कुस्त्यांसाठी साडेतीन लाखाची बक्षिसे देण्यात आली.
या मैदानास कडेगावचे तहसीलदार हेमंत निकम, संतोष वेताळ आदींसह भागातील सर्व कुस्ती शौकीन व वस्ताद मंडळींनी भेट दिली. तब्बल २५० ते ३०० मल्ल या मैदानात उपस्थित होते.
मधुकर कांबळे, शिवाजी महाडिक, रंगराव महाडिक, संतोषशेठ महाडिक, जालिंदर महाडिक, इंद्रजित साळुंखे, संजय विभूते, एच.डी. महाडिक, मधुकर महाडिक, अशोक चव्हाण, राहुल महाडिक, सरपंच बाळासाहेब महाडिक, आदी उपस्थित होते. सुरेश गवळी यांनी समालोचन केले. (वार्ताहर)