मनमाड, हिंगोली, इंदापूर, बदलापूर संघांची घोडदौड
By Admin | Updated: February 16, 2015 23:09 IST2015-02-16T22:23:28+5:302015-02-16T23:09:45+5:30
नगराध्यक्ष चषक कबड्डी : फलटण, इचलकरंजीची ‘खो खो’त आघाडी

मनमाड, हिंगोली, इंदापूर, बदलापूर संघांची घोडदौड
विटा : विटा नगरपरिषदेच्यावतीने येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय नगराध्यक्ष सुवर्णचषक कबड्डी स्पर्धेत मनमाड, तासगाव, इस्लामपूर, खेड, इचलकरंजी, हिंगोली, कुरूंदवाड, बदलापूर व इंदापूर नगरपरिषदांच्या संघांनी चमकदार कामगिरी करीत उपांत्यपूर्व फेरीत विजयी सलामी दिली.विटा येथे आज, सोमवारी कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मनमाड विरूध्द फलटणच्या या संघात सामना झाला. हा सामना मनमाड पालिकेच्या संघाने ३२ गुणांनी जिंकला. तासगावच्या संघाने पनवेल पालिका संघाचा ३६ गुणांनी पराभव केला. इस्लामपूरच्या संघाने अचलपूरच्या संघावर ३८ गुणांनी मात केली. तसेच खेड विरूध्द रामटेकमधील सामना खेड पालिकेच्या संघाने अवघ्या दोन गुणांनी जिंकला.इचलकरंजी (अ) संघाने ४० गुणांनी जत पालिका संघावर मात करून विजय संपादन केला. महाबळेश्वर विरूध्द हिंगोलीमधील सामना हिंगोली संघाने २० गुणांनी जिंकला. कुरूंदवाड संघाने रत्नागिरीच्या संघाचा १५ गुणांनी पराभव केला, तर इचलकरंजी (ब) संघाचा बदलापूर संघाने ४० गुणांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत चमकदार कामगिरी केली. कबड्डी स्पर्धेत मनमाड संघाचा तासगावच्या संघाने पराभव केला, तर इंदापूर संघाने कागल संघाचा १४ गुणांनी पराभव केला.राज्यस्तरीय नगराध्यक्ष सुवर्णचषक खो-खो स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत फलटण संघाने कुरूंदवाड संघाचा पराभव केला. मालवण संघावर सातारा संघाने विजय मिळविला. खोपोली विरूध्द इचलकरंजी नगरपरिषद संघात झालेल्या सामन्यात इचलकरंजी संघाने विजय संपादन केला. विटा (ब) संघाने तिरोरा संघाचा पराभव केला. तासगाव संघाने महाबळेश्वरच्या संघावर विजय मिळविला, तर श्रीवर्धन संघाने रत्नागिरी संघावर मात करून विजय संपादन केला. खो-खो स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अनेक संघांनी चमकदार कामगिरी केली. (वार्ताहर)
बुध्दिबळ : जाधव आघाडीवर
यावेळी झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत मालवण नगरपरिषदेचे बी. एम. स्वामी, तिरोडा नगरपरिषदेचे संदीप ताराम व सातारा नगरपरिषदेचे कल्याण राक्षे हे खेळाडू अंतिम विजेते ठरले. तसेच बुध्दिबळ स्पर्धेत एकूण ७५ खेळाडू सहभागी झाले होते. ६ व्या फेरीअखेर सहा गुणांनी अजय जाधव आघाडीवर राहिले, तर प्रफुल्ल कोसालकर (दारव्हा नगरपरिषद), आर. पी. झंवर, नीलेश जाधव, प्रकाश कांबळे (विटा नगरपरिषद) व विनायक मोरे (अलिबाग नगरपरिषद) हे पाच खेळाडू संयुक्तिक दुसऱ्या स्थानावर राहिले.